Nanded Shivsena News : नांदेड मध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी महापालिका जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. जिल्ह्यात भाजपची शक्ती जास्त आहे. राज्यात, केंद्रात आपले सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण स्वबळावर लढले पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या, तुम्ही जे सांगाल तसेच होईल, असा शब्द देत अशोक चव्हाण यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे.
महायुतीतील घटक पक्षांना मात्र अशोक चव्हाणांचे हे 'एकला चलो रे'धोरण आवडलेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, त्यांना अजून भाजप कळलीच नाही, अशा शब्दात हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या स्वबळाचा समाचार घेतला.
गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात आणि राज्यात शिवसेना-भाजप युती एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आली आहे. नांदेड जिल्ह्यात यापुढेही ती परंपरा कायम राहावी अशी, आमची इच्छा आहे. परंतु अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका म्हणजे ती भाजपची भूमिका आहे, असे म्हणता येणार नाही. कारण अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत? याचा निर्णय राज्यातील वरिष्ठ नेते घेतील, असेही हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.
एकूणच नांदेड जिल्ह्यात भाजप बळकट करण्याच्या नावाखाली अशोक चव्हाण स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. हेमंत पाटील यांनी यापूर्वीही अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली होती. अशोकाच्या झाडाचे उदाहरण देत हे झाड दिसायला सुंदर, हिरवे, टवटवीत आणि उंच असले तरी त्याची सावली मात्र स्वतःलाच मिळते, असा टोला हेमंत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात लगावला होता.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची स्वतंत्रपणे तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. स्थानिक भाजपचे नेतेही फारसे त्यांच्यासोबत फिरताना दिसत नाहीत. अशोक चव्हाण यांच्या या स्वतंत्र तयारीमुळे महायुतीतील शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येही खदखद दिसून येत आहे. हेमंत पाटील यांनी ही खदखद बोलून दाखवल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण विरुद्ध महायुतीतील इतर नेते असे चित्र दिसले तर नवल वाटायला नको.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.