Marathwada BJP News : लोकसभा निवडणुकीआधी भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षभरात पक्षा आपले बस्तान बसवले आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेत महायुतीचा पराभव झाला असला तरी त्यांची झळ चव्हाण यांना फारशी बसली नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्रातच युतीचा सुपडासाफ झाला होता. तर सहा महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे महायुतीवर मतांचा अक्षरश: पाऊस पडला.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण, देगलूर-बिलोलीतून जितेश अंतापूरकर या आपल्या दोन हक्काच्या जागा निवडून आणल्या. आता विधान परिषदेत त्यांना आपले लाडके अमर राजूरकर यांना पुन्हा पाठवायचे आहे. अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा शब्द भाजपा नेतृत्वाकडून डावलाल जात नाही, हे श्रीजया चव्हाण, जितेश अंतापूरकर यांना मिळालेल्या उमेदवारीवरून दिसून आले होते. ते पाहता अमर राजूरकर यांच्यासाठी अशोक चव्हाणांकडून सुरु असलेले लाॅबिंग यशस्वी ठरणार असे दिसते.
विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची शिफारस दिल्लीच्या नेतृत्वाकडे करण्यात आल्याची चर्चा आहे. तर इकडे (Nanded) नांदेडमध्ये भाजपातील निष्ठावंत अॅड. चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे यांनीही आपल्या संधी मिळावी, यासाठी जोर लावला आहे. आता अशोक चव्हाण यांच्यापुढे या निष्ठावंतांचा जोर किती टिकतो? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपा तीन व शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक एक जागा लढवणार आहे. भाजपाच्या कोट्यातली एक जागा अशोक चव्हाण यांनी अमर राजूकर यांच्यासाठी मागितली आहे. या संभाव्य उमेदवारांमध्ये माधव भांडारी, दादाराव केचे यांसह काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत. ही तीनही नावे दिल्लीत मंजूरीसाठी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.
तर चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे यांनीही थेट दिल्ली गाठून पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी साकडे घातल्याची माहिती आहे. तर अमर राजूकर हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. यापूर्वी दोनवेळा अमर राजूकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. आगामी नांदेड महापालिका,जिल्हा परिषद निवडणुकीत आपला वरचष्मा राहावा, यासाठी अशोक चव्हाण यांना आणखी एक हक्काचा आमदार जिल्ह्यात हवा आहे. अमर राजूकर यांच्या रुपाने तो ते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
पुन्हा नवा-जुना वाद..
दुसरीकडे भाजपातील निष्ठावंतांना संधी द्या, अशी मागणी करत चैतन्यबापू देशमुख यांनी राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय कौडगे हे पक्षाचे विभागीय संघटनमंत्री असून, त्यांचे फडणवीस व वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे तेही विधान परिषदेसाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या 40 वर्षांत भाजपाने नांदेडमधून विधान परिषदेसाठी केवळ राम पाटील रातोळीकर यांना संधी दिली होती. गेल्या वर्षभरात राज्यसभेसाठी नांदेडच्या दोन नेत्यांना संधी दिल्यानंतर, आता विधान परिषदेसाठीही नांदेडला संधी मिळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.