Beed Politics : माजी मंत्री क्षीरसागर, डॉ.ज्योती मेटे निवडणुकीच्या रिंगणात, पक्ष मात्र गुलदस्त्यात

Beed Politics Jyoti Mete jaydatta kshirsagar : शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचे कार्यक्रम आणि जनसंपर्क दौरे पाहता त्या बीड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे निश्‍चित मानले जाते.
 Jyoti Mete jaydatta kshirsagar
Jyoti Mete jaydatta kshirsagar sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे बीड मतदार संघातील जनसंपर्क दौरे पाहता आता माघार नाही असा चंग त्यांनी बांधलेला दिसतो. शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचीही याच मतदारसंघातून वर्षभरापासून मोट बांधणी सुरु आहे.

मेट यांनीही मतदारसंघातील कार्यक्रम आणि जनसंपर्क दौरे पाहता त्याही याच बीड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे निश्‍चित मानले जाते. मात्र, हे दोन नेते कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण, पक्ष नसला तरी अपक्ष का होईना लढायचेच असे दोघांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी दोन वेळा जुन्या चौसाळा विधानसभा मतदारसंघातून तर दोन वेळा ते बीड मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. जयदत्त क्षीरसागर यांचा पंचायत समितीचे सभापती, उपममंत्री ते राज्याचे उर्जा मंत्री असा राजकीय प्रवास आहे. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

2014 च्या मोदी लाटेत जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमेव जयदत्त क्षीरसागर आमदार होते. मात्र, बंडखोरी केलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी जवळ करत असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद॒धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले.

 Jyoti Mete jaydatta kshirsagar
Sharad Pawar News : शरद पवार पक्षाच्या रडारवर फडणवीस, अजित पवार

ठाकरे यांनीही त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये सहा महिन्यांसाठी मंत्रिपद दिले. पण, दीड वर्षांपूर्वी नगरोत्थानच्या कामांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्याच्या मुद्द्यावरुन पक्षाने त्यांना निलंबित केले. तेव्हापासून ते कोणत्याच पक्षात नाहीत. वर्षभरापूर्वी त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर देखील त्यांना सोडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले आहेत.

दरम्यान, मे महिन्यात झालेल्या लोकसभेला निवडणुकीत त्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. आता त्यांनीही विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरणार हे निश्‍चित नाही.

लोकसभेला त्यांनी पाडलेल्या वाटेने ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाऊ शकतात, अशी चर्चा असली तरी हा पक्ष विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना टाळून उमेदवारी देईल का, ही शंका आहेच. मधल्या काळात काका जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यात समेटाची बैठक झाल्याची चर्चा रंगली. मात्र, त्यातून अद्याप तरी काही पुढे आलेले नाही. त्यामुळे माजी मंत्री क्षीरसागर बीड विधानसभेच्या रिंगणात उतरणार निश्‍चित असले तरी त्यांच्या पक्षाबाबत आज तरी निश्‍चित नाही.

लोकसभेला बजरंग सोनावणेंना मदत?

शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्या बाबतही आहे. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसंग्रामची कमान सांभाळणाऱ्या डॉ. मेटेंचे लक्ष्यही बीडवरच आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात सहकार सहनिबंधक पदाचा राजीनामाही दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेतही त्या होत्या. लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामने ‘तटस्थ’ भूमिका घेतली असली तरी शिवसंग्रामांच कल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या बाजूनेच होता.

मेटेंचे गावनिहाय दौरे

लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी पुन्हा विधानसभेची तयारी सुरु केली असली तरी आजघडीला त्यांचा पक्ष ना महायुतीत आहे ना आघाडीत. त्यामुळे डॉ. ज्योती मेटे देखील कोणत्या पक्षात जाणार आणि उमेदवारी मिळविणार, हा पेच कायमच आहे. सध्याही त्या मतदारसंघात गावनिहाय दौरे करत आहेत. निवडणुक लढविणारच हे ठाम सांगणाऱ्या डॉ. ज्योती मेटे कोणत्या चिन्हावर मैदानात असणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

 Jyoti Mete jaydatta kshirsagar
P. V. Narasimha Rao : विनम्र, विनयशील पी. व्ही. नरसिंह राव!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com