Sharad Pawar News : शरद पवार पक्षाच्या रडारवर फडणवीस, अजित पवार

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य उमेदवार व मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत.
Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

सदानंद पाटील

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी कधी नव्हते एवढे राजकीय पक्ष, बंडखोरी आणि आघाड्यांचे राजकारण आणि उट्टे काढण्याची स्पर्धा आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षप्रमुखांसह त्यांच्या बिनीच्या शिलेदारांचा कस लागणार असून, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बिनीचे शिलेदार मैदानात उतरल्याचे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jaynat Patil) हे संभाव्य उमेदवार व मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या प्रचारात सध्या विरोधी पक्षातील अन्य नेत्यांपेक्षा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही नेत्यांना लक्ष्य करण्याचे कारणही अर्थातच त्यांनी ‘राष्ट्रवादी’त पाडलेली फूट' हे आहे. ( Sharad Pawar News)

राजकीय संघर्षाचे दुसरे पर्व

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेनंतर अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात भाजपला यश आले. या फुटीमुळे पक्ष खिळखिळा करण्याचा प्रयत्न झाला. एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि लोकसभेची निवडणूक अशा दुहेरी आघाड्यांवर शरद पवार यांना लढाई करावी लागली. यातूनही सावरत त्यांनी पक्षाची तर घडी बसवलीच पण लोकसभेला दुरावलेल्या सहकाऱ्यांना साद घालत चांगली मोट बांधली. त्यामुळे या निवडणुकीत विजयाचा ‘स्ट्राईक रेट’ उत्कृष्ट ठेवण्यात त्यांना यश आले.

या काळात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेली वक्तव्ये आणि सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात लावलेली ‘दमदार फिल्डिंग’ चर्चेची ठरली. कोणत्याही परिस्थितीत सुळे आणि कोल्हे यांचा पराभव करण्याचा अजित पवार यांनी जणू चंगच बांधला होता. मात्र, सत्ता आणि ताकद असूनही त्यांना या दोन्ही उमेदवारांना पराभूत करणे शक्य झाले नाही. आता राजकीय संघर्षाच्या ‘पार्ट टू’ला सुरवात झाली आहे.

सुळे, कोल्हेंकडून पलटवार

लोकसभेनंतर सुळे आणि कोल्हे यांनी थेट अजित पवार यांच्यावरच पलटवार करण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि विशेष करून अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक वर्षे सत्ता असतानाही अजित पवार यांच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार कसा भोंगळ पद्धतीने चालला आहे इथपासून ते ‘महाराष्ट्र फक्त दोनच साहेबांना ओळखतो,’असे सांगत अजित पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न कोल्हे यांच्याकडून होत आहे. तर सुळे यांनीही प्रचाराचा रोख राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर ठेवला आहे.

त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत गेल्याचे सतत सांगणाऱ्या अजित पवार यांना वेगवेगळ्या घटनेवरून ‘हाच का विकास?’ अशी विचारणा करत आहेत. या सर्व वक्तव्यांमागे पक्षात पाडलेली फाटाफूट, नेत्यांमागे लावलेली चौकशी यंत्रणा, विकासनिधी देताना केलेला अन्याय या बाबी असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात धक्कादायक वळण; वडील दिलीप खेडकर यांचे थेट 'या' मंत्र्यावर गंभीर आरोप

महायुतीच्या कारभाराचा पंचनामा

सुळे आणि कोल्हे यांच्याबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मनमानी पद्धतीने गृह खात्याचा कसा वापर सुरू आहे, तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कसे प्रयत्न झाले, याचा ते वारंवार पुनरुच्चार करत असून, त्यामधून ते फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.

या तिन्ही नेत्यांनी राज्यातील महायुतीच्या कारभाराचा पंचनामा करताना अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडही या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून आक्रमकपणे अजित पवार यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराची प्राथमिक दिशाच निश्चित झाली असल्याचे यावरून दिसू लागले आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Anil Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्याला आमदार करण्याची मंगळवेढा राष्ट्रवादीला भलतीच घाई!

पक्षसंघटना विस्तारावरही भर

एकसंध राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्षांवर अप्रत्यक्षरीत्या अनेक निर्बंध होते. एखाद्या पदाधिकाऱ्याला कमी करणे, नवीन नियुक्ती देणे असो किंवा कार्यकर्त्यांच्या तक्रारी असो, त्यांना न्याय देणे शक्य होत नव्हते. जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला डावलून काहीही निर्णय घेता येत नव्हते. परिणामी ‘राष्ट्रवादी’त निवडक लोकांची मक्तेदारी झाली होती. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होत होता.

अनेकांनी या त्रासाला कंटाळून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’त असणारे वाद, नाराजी दूर करण्यात यश आले नाही. कारण जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांना डावलून निर्णय घेण्याची पद्धत पक्षात नसल्याने त्यांना मर्यादा आल्या होत्या. आता मात्र ते एका बाजूने पक्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

नवनवीन उमेदवार उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून, त्यात बऱ्याच अंशी ते यशस्वी होताना दिसत आहेत. एका बाजूने सुळे, कोल्हे आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडत असताना दुसऱ्या बाजूने पक्ष संघटनेचे जाळे राज्यभर पोहोचवण्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत दिसून येईल, अशी कार्यकर्त्यांनाही अपेक्षा आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Jayant Patil News
Nagpur Poliitics: आमदार'कीसाठी इच्छुक देशमुख भावंडांमध्ये रेल्वेच्या थांब्यावरून श्रेयवादाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com