

सचिन चोबे
Shivsena-BJP Politics : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सिल्लोडमध्ये सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यात मंत्री संजय शिरसाट आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांचे नाव घेणे टाळले; मात्र मंत्री अतुल सावे यांनी थेट सत्तारांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण त्यांच्या पाठिंब्यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी चव्हाण यांना आमचा पाठिंबा नाही, असे जाहीर केले होते. पण शिवसेनेचा हा आक्रमक बाणा काही तासातच गळून पडला. सतीश चव्हाण यांच्यासोबत आपल्या घरी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी आम्ही सतीश चव्हाण यांचे तनमनधनाने काम करणार, असा युटर्न घेतला.
शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना काही हा निर्णय पटला नाही. आपल्या स्वभावानूसार त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी आपल्याच संपर्क कार्यालयात मेळावा घेतला. याचे पडसाद काही प्रमाणात महायुतीमध्ये उमटले, मात्र सत्तार ऐकणार नाही म्हटल्यावर, नेत्यांनीही त्यांना समजावण्यात आपला वेळ वाया घालवला नाही. सत्तार यांनी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनाही आपल्या बाजूने वळवले होते, पण त्यावेळीच सावध झाल्या आणि आज कन्नड, सिल्लोडमध्ये महायुतीच्या व्यासपीठावर दिसून आल्या.
सिल्लोडमध्ये आज सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे यावेळी उपस्थिती होते. या मेळाव्यात शिरसाट, दानवे यांनी एकमेकांना चांगलेच चिमटे काढले. सत्तार याचे नाव टाळत दोघांनी त्यांचे नाव घेणार नाही, म्हणत एकमेकांना गुगली टाकली. संजय शिरसाट म्हणाले, "माझी त्यांच्याशी दानवेंसारखीच मैत्री आहे, मग मी त्यांचे नाव कशाला घेऊ"? असा चिमटा दानवेंना काढला. तर दानवेंनी तुम्ही त्यांचे नाव घेतले नाही, तर मी पण घेत नाही. त्यांनी कधी पक्षाचे काम केले का? असा टोला सत्तार यांना नाव न घेता लगावला.
शिरसाट-दानवे यांचा हा हातचे राखून ठेवण्याचा प्रकार चाणाक्ष अतुल सावे यांच्या लक्षात आला. हीच संधी असल्याचे पाहून अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. अब्दुल सत्तार हे इथले काॅक्रोच आहेत, त्यांना एकनाथ शिंदेंचे पण ऐकायचे नाही, असे म्हणत सुनावले. दानवे-शिरसाट यांनी सत्तार यांचे नाव घ्यायचे टाळले, सत्तार यांना काही काळासाठी साथ देणाऱ्या आमदार संजना जाधव यांचीही सावेनी फिरकी घेतली. सत्तारांनी कन्नडमध्ये वेगळा प्रचार केला,संजना जाधव त्यांच्यासोबत दिसल्या, त्यामुळे आज कन्नडमध्ये गेलो व त्यांना सिल्लोड येथे घेऊन आलो, त्या भरकटल्या होत्या, असा चिमटाही सावे यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.