

भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवर गावकऱ्यांच्या एका गटाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यातील बॉक्सनगर परिसरातील अशाबारी येथे ही घटना घडली. या हल्ल्यात 4 BSF जवान जखमी झाले असून, हल्लेखोरांनी जवानांकडील रायफल हिसकावण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी त्रिपुरा पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.
BSF जवानांनी बांगलादेश सीमेजवळ सुरू असलेला तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला होता. याच कारवाईचा राग मनात धरून काही संशयित तस्कर आणि त्यांच्या साथीदारांनी जवानांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ड्युटीवर असलेल्या जवानांमध्ये एका असिस्टंट कमांडंटचाही समावेश होता.
या हल्ल्यादरम्यान आरोपींनी लाठी-काठ्यांनी जवानांना मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न केला. हल्लेखोरांनी BSF च्या सरकारी वाहनाची तोडफोड केल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही पुरुष आणि महिला मिळून BSF जवानांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. एका महिलेने जवानाच्या डोक्यावर काठीने वार केल्याने तो रस्त्याच्या कडेला कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. विशेष म्हणजे, जवानाच्या हातात रायफल असतानाही त्याने हल्लेखोरांवर गोळीबार केला नाही. याचदरम्यान एका व्यक्तीने जवानाची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसते.
हल्ल्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. मात्र, सुरक्षा दलाने एका संशयिताला घटनास्थळापासून सुमारे 400 मीटर अंतरावर पकडले. त्याची ओळख हेजफुर रहमान अशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्रिपुरा पोलिसांनी या प्रकरणात एकूण 8 जणांना अटक केली.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी BSF जवानांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा आणि तस्करीविरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.