

Mahajoyti Exam 2026 : एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच महाज्योतीकडून घेण्यात आलेल्या आजच्या परीक्षेत पुण्यातील एका केंद्रावर संगणक व्यवस्था कोलमडून पडल्याने तेथील परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढावली.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावर बोलताना अतुल सावे म्हणाले की, "आम्ही पंचवीस हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाचवेळी घेतो. आतापर्यंत कधीही चुकीचे किंवा परीक्षा रद्द करण्याची वेळ आली नाही. चाळीस विद्यार्थ्यांच्या एका हाॅलमध्ये संगणकाला आवश्यक कनेक्टिव्हिटी न मिळू शकल्याने तिथे गोंधळ झाला".
याची माहिती मिळताच एमडींना तिकडे पाठवण्यात आले. या एकाच सेंटरवरची परीक्षा रद्द करावी लागली, हे मी कबूल करतो. परंतु त्यांच्या शेजारच्या हाॅल, केंद्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा व्यवस्थीत आणि पारदर्शकपणे पार पडली आहे.
घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, यात जे दोषी असतील त्यांच्या कारवाई केली जाईल. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तांत्रिक कारणामुळे घडलेला हा प्रकार आहे. माझ्यावर केले जाणारे आरोप आणि राजीनाम्याची मागणी बेसलेस आहे. असे सावेंनी सांगितले.
दोनशे सेंटरवर परीक्षा सुरळीत पार पडली, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. मी पाच वर्षापासून ओबीसी मंत्री आहे, आम्ही दोनशे परीक्षा आतापर्यंत घेतल्या आहेत. लाखो विद्यार्थी या परीक्षांना बसतात त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, असेही सावे म्हणाले.
यावरून माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला अतुल सावे यांनी लगावला. छत्रपती संभाजीनगर येथे राजीनाम्याच्या मागणीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीवरून टीका करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिले. आठ-पंधरा दिवस शिष्यवृत्ती जमा होण्यास उशीर झाला असेल. परंतु विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात आम्ही वेळच्यावेळी शिष्यवृत्ती जमा करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील तांत्रिक गोंधळावरून ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षेत पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर संगणक सुरू न झाल्याने परीक्षा रद्द करावी लागली.
ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याने सकाळी ९ वाजता नियोजित परीक्षा सुरूच होऊ शकली नाही. विद्यार्थी सुमारे दोन तास केंद्रावर थांबले. अखेर त्या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली. पुणे आणि नांदेडमधील दोन केंद्रांवरील परीक्षा रद्द करून १० ऑक्टोबरला फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षा व्यवस्थेतील या ढिसाळपणासाठी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार पक्षाने केली. महाज्योतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत मंत्री अतुल सावे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.