

Marathwada News : सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा से समर्पण हा कार्यक्रम राबवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी परभणी दौऱ्यावर होते. गेल्यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांचा शेतकरी मेळावा परभणीत आयोजित केला होता. त्यावेळी मनोज जरांगे यांनी याला विरोध दर्शवत शिंदे आणि परभणाचे खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती.
जरांगे यांच्या विरोधानंतरही शिंदे यांचा तो मेळावा तेव्हा पार पडला होता. त्यानंतर महिनाभरातच पुन्हा परभणीत येत एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांना भरभरून मदत केली. यावेळी त्यांच्या दौऱ्यात कुठलाही विरोध दिसून आला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमासंदर्भात कुठेलही भाष्य केले नाही, की मराठा आंदोलकांना आवाहन केले नाही.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा कार्यक्रम असल्याने जरांगे पाटील यांनी शिंदेंच्या या परभणीतील कार्यक्रमाला विरोध केला नसल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले, " संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असून, शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दुष्काळाच्या संकटात केंद्र-राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व कष्टकरी कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना सायकल तर महिलांना शिलाई मशीनचे वाटप यावेळी वाटप करण्यात आले.
राज्यातील सुमारे ८० टक्के भाग दुष्काळग्रस्त असून, पावसात मोठा खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, शेंगा भरलेल्या नाहीत. शेतकऱ्यांची ही परिस्थिती सरकारला पूर्णपणे माहीत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
या संकटकाळात केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला आहे. कर्जवसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काचा प्रश्न तसेच शेती व पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारी तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. शेतकरी सन्मान योजना असो किंवा संकटातील मदत, त्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही. लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या काळात राजकारण करण्याची वेळ नसून, शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण भक्कमपणे उभे राहते हे महत्त्वाचे आहे.
या संकटकाळात शिवसेनाचा आता ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण करण्याचा निर्धार असल्याचे शिंदे यांनी मोठे विधान केले. परभणी जिल्ह्यातील गावांना जायकवाडीचे पाणी पोहोचविण्यासह ६५ गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील. लोअर दुधना प्रकल्प कालव्यांची कामे पूर्ण करून लाभक्षेत्राला पुरेसे पाणी दिले जाईल. तसेच भूमिगत गटार योजना, घनकचरा प्रकल्प, क्रीडा संकुल, नाट्यगृह, पायाभूत सुविधा आणि नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
यावेळी खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, सईद खान, आनंद भरोसे, विशाल कदम, माणिक पोंढे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.