

Beed Politics : विलास घुले हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मीक कराडने बीड कारागृहातून बाहेर फोन केल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. त्यानंतर बीड कारागृह प्रशासन हादरून गेले. आधीच वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते यावरून कारागृह निरीक्षक व प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
जेल प्रशासनाने हे सगळे आरोप फेटाळले असले तरी आता बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड याला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्याचे न्यायालयाचे आदेश असताना बीड कारागृहातच का ठेवले? अशी विचारणा करणारे पत्र अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षकांना पाठवले आहे. वाल्मिक कराडला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करा, अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक बाबुराव कराड याला बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याच्या न्यायालयीन आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी त्यांनी कारागृह व सुधारसेवा विभागाच्या अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षकांना पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
खासदार सोनवणे यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधले आहे. न्यायालयाने १३ जानेवारी २०२५ रोजी आदेश क्रमांक २२०/२०२५ अन्वये वाल्मिक कराड याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कारागृह प्रशासनाकडूनही बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा उल्लेख सोनवणे यांनी केला आहे.
मात्र, न्यायालयाचा आदेश आणि वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही कराड याला अद्याप बीड जिल्हा कारागृहातून हलविण्यात आले नसल्याचे सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्यामागे नेमकी कोणती प्रशासकीय अडचण आहे किंवा कोणाचा दबाव आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वाल्मिक कराड याला तातडीने छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करावे, तसेच आतापर्यंत आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही, याचा सविस्तर लेखी अहवाल आणि कारणे सादर करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या पत्राची प्रत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) आणि बीड जिल्हा कारागृह अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीबाबत कारागृह प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.