Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट को - ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या ठेवीदारांना मागच्या सहा महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या द कुटे समुहाचे प्रमुख सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. एका ठेवीदाराने न्यायालयात धाव घेतल्याने फसवणुकीसह (Fraud Case) इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
'द कुटे उद्योग समूहा'चे सुरेश कुटे व अर्चना कुटे यांची बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी आहे. बीडपासून राज्यातील इतर भागांसह इंदौरपर्यंत 50 शाखा आणि साडेसहा लाख ठेवीदार आहेत. ज्ञानराधात दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत. दरम्यान, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कुटे समुहाची अगोदर आयकर विभागाने व नंतर सक्तवसुली संचालयाने (ED) तपासणी केली. त्यामुळे ज्ञानराधातून ठेवी काढण्यास झुंबड उडाली.
लिक्वीडीटी फंड संपल्यानंतर त्यांनी सर्व शाखा बंद केल्या. द कुटे समुहाचे समभाग विकून ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसे देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर अर्चना कुटे व त्यांच्या मुलाने नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठेवीदारांना ठेवी मिळण्याच्या आशा वाढल्या. मात्र, त्यानंतर ते सातत्याने ठेवीदारांना पैसे देण्याच्या तारखा देत आहेत.
अलिकडे त्यांनी एका परदेशी गुंतवणूकदाराकडून त्यांच्या कुटे समुहात गुंतवणूक केली असून त्यातील दोन हजार कोटी रुपये ज्ञानराधाच्या खात्यात आल्याचे सांगून 21 तारखेपासून ठेवी वाटपास सुरुवात करण्याचे आश्वास दिले होते. मात्र, त्यांच्यावर माजलगावला दोन गुन्हे नोंद झाले. या गुन्ह्यांमुळे तांत्रिक अडचण आल्याचे कारण सुरेश कुटेंनी सांगितले व लवकर ही अडचण दूर करुन पैसे वाटप करणार असल्याचे पुन्हा आश्वासन दिले.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
थोडे थांबा, गुन्हे दाखल करु नका, गुन्ह्यांमुळे पैसे मिळण्यास अडचण होत असल्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र, ज्ञानराधाच्या जालना रोड शाखेतील 13 लाख 42 हजार रुपयांच्या ठेवी प्रकरणी दिलीपकुमार बापुसाहेब चिंचोलीकर या सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचे ॲड. विरेंद्र थिगळे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने सुरेश कुटे व संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत. यात त्यांच्या पत्नी व ज्ञानराधाच्या कार्यकारी संचालक अर्चना कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, जनरल मॅनेजर नारायण शिंदे, कार्यकारी अधिकारी रीराम हाडुळे, उपकार्यकारी अधिकारी श्रीकांत आमटे, शाखाधिकारी निखिल कुलकर्णी आदींची समावेश आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.