Beed News : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर धर्मदाय विभागाने मंदिरांच्या कारभारावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली आहेत. अशातच ज्या देवस्थानांमध्ये वाद आणि कारभाराबद्दलच्या तक्रारी आहेत, त्या मंदिर व विश्वस्त मंडळांची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री मन्मथ स्वामी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील दोन गटांच्या वादात आणि दानव्यवहारातील कथित गैरकारभाराच्या तक्रारींवर अखेर धर्मादाय विभागाने मोठा दणका दिला आहे.
बीड येथील श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोमवारी (ता. २३) सुरू होणाऱ्या कार्तिक पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दानपेट्यांची चावी आणि आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण आता थेट धर्मादाय विभागाच्या निरीक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. धर्मादाय उपआयुक्त कां. सं. जाधव यांनी दिलेल्या या दणक्यानंतर मनमानी कारभार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक कपिलधार येथे दाखल होतात.
या यात्रेत देवस्थानला कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि धान्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. मात्र, देवस्थानमधील अंतर्गत वाद आणि या देणग्यांचा अधिकृत हिशेब ठेवला जात नसल्याचा गंभीर आरोप करत मांजरसुंबा ग्रामस्थ व भाविकांनी धर्मादाय विभागाकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत १९ नोव्हेंबर रोजी उपआयुक्तांनी हे ऐतिहासिक निर्देश जारी केले आहेत.
दरम्यान, स्वतंत्र यात्रा व्यवस्थापन समिती नेमण्याची मागणी उच्च न्यायालयाच्या जैसे थे आदेशामुळे अमान्य करण्यात आली असली, तरी संपूर्ण यात्रेवर धर्मादाय निरीक्षकांचा पूर्णवेळ वॉच राहणार आहे. यात्रा संपल्यानंतर निरीक्षकांना याचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार असल्याने, दोन गटांच्या वादात अडकलेल्या देवस्थानच्या तिजोरीवर आता प्रशासनाचा कडक पहारा बसला आहे.
आदेशानुसार, कपिलधार देवस्थान परिसरातील सर्व दानपेट्या धर्मादाय विभागाचे निरीक्षक, विश्वस्त आणि पंचांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली सीलबंद केल्या जातील. दानपेट्या उघडताना आणि मोजणी करतानाही निरीक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून, या संपूर्ण प्रक्रियेचे फुटेज जतन करावे लागणार आहे. मोजणी झालेली रोख रक्कम स्वतंत्र नोंदवहीत नोंदवून तात्काळ न्यासाच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
तसेच भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंचे फोटो काढून त्यांची स्वतंत्र नोंद करावी आणि तातडीने न्यासाच्या बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे, असेही स्पष्ट केले आहे. तसेच नाशवंत वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्नही थेट बँक खात्यात जमा करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.