

Local Body Election News : मागच्या निवडणुकीत साधे जिल्हा परिषद सदस्य असताना संदीप क्षीरसागर यांनी आमदार आणि नगराध्यक्ष असलेल्या दोन्ही काकांच्या नाकी नऊ आणत नगर पालिकेची अर्धी सत्ता मिळविली होती. मात्र, दोनदा आमदार करण्यात मोलाचा वाटा असलेल्या बीड शहरात संदीप क्षीरसागरांचा स्ट्राईक रेट या निवडणुकीत घसरला. एमआयएमचाही करिष्मा अगदीच पुसट झाल्याचे निकालावरुन दिसते.
2016 मध्ये नगर पालिका निवडणुकीवेळीच संदीप क्षीरसागर यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले होते. क्षीरसारांच्या घरातील फुटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काकू - नाना आघाडीच्या माध्यमातून नगर पालिका लढविली. त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांचा भाऊ डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला. परंतु, त्यांच्या आघाडीचे 50 पैकी 19 नगरसेवक विजयी झाले.
त्यानंतर त्यांनी राजकीय डावपेच आखत एमआयएमला गळाला लावत उपनगराध्यक्षपद आणि सभापतीपदही मिळविले. त्यानंतर त्यांनी दोन विधानसभा बीडमधून लढविल्या आणि जिंकल्याही. मागच्या निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बीडकरांनी संदीप क्षीरसागरांनाच झुकते माप दिले. तर, मागच्या विधानसभा निवडणुकीत चुलतबंधू डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या विरोधातही बीडकरांचा कल संदीप क्षीरसागरांकडेच होता.
मात्र, आमदार झाल्यानंतरच्या पहिल्या नगर पालिका निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स कमालीचा घसरल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्षदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. तर, आता 52 नगरसेवकांपैकी त्यांचे केवळ 12 विजयी झाले. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरसेवक त्यांच्या आघाडीकडून विजयी झाला. बीडमध्ये पक्षाची घसरण आणि संदीप क्षीरसागरांची क्रेझ कमी का झाली? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
हीच गत एमआयएमचीही झाली. मागच्या निवडणुकीत एमआयएमने नगरसेवकांची दोन आकडी संख्या गाठली होती. तर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख निजाम दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी नगर पालिकेत एमआयएमचा 52 पैकी केवळ एक नगरसेवक विजयी झाला आहे. मागच्या नगर पालिका निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात पाऊणलाखांची वाढ झाली.
पण, एमआयएमच्या उमेदवाराला केवळ 4200 मतांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही बीडवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या घसरणीची आमदार संदीप क्षीरसागर व एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक कसे आत्मचिंतन करतात आणि त्यावर काय उपाय योजना करतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.