विधानसभा जवळ आल्याने आता तीनही क्षीरसागर बीड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बाशिंग बांधून आहेत. क्षीरसागरांकडून लोकपयोगी कामे करण्याचा आव आणला जात आहे. सत्तेत असताना क्षीरसागर कुटुंबीयांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी काहीच केले नाही. आता तीनही क्षीरसागर निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना स्वतःच्या संस्थांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मते लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला.
क्षीरसागरांचा हा जुनाच फंडा असल्याचा टोलाही सचिन मुळूक यांनी लगावला. तरुणांनी वेळीच सावध होऊन क्षीरसागरांचा डाव हाणून पाडावा, असे आवाहनही मुळूक यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) जिल्हाध्यक्ष असलेले संदीप क्षीरसागर ( Sandeep Kshirsagar ) पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही मतदारसंघात जोरदार संपर्क वाढविला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवित त्यांनाही उमेदवारीचे संकेत दिल्याचे डॉ. क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर हे दोघे सध्या दोघांचाही संपर्क जोरात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी क्षीरसागरांना डिवचले आहे.
सचिन मुळूक म्हणाले, "सध्या बेरोजगारीचा प्रश्न प्रखरतेने जाणवत आहे. कायम सत्तेत असलेल्या क्षीरसागर कुटुंबियांनी मात्र सत्ता काळात कोणत्याही प्रकारचा उद्योग बीड जिल्ह्यात आणला नाही. बेरोजगारी कमी करण्याचा कसलाही प्रयत्न केलेला नाही."
"केवळ सत्तेच्या माध्यमातून स्वत:च्या संस्थांचे जाळे निर्माण करुन हित साधले. आतापर्यंत क्षीरसागर कुटुंबियाचे राजकारण स्वत:च्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालले आहे. कोणतीही निवडणूक आली की समाजातील, संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक असलेल्या तरुणांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवणे आणि मते लाटून घेणे हा क्षीरसागर कुटुंबीयांचा फंडा आहे," अशी टीका मुळूक यांनी म्हटलं.
"आता जयदत्त क्षीरसागर ( Jaydutta Kshirsagar ), संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर हे तिघेही वेगवेगळे झाले आहेत. प्रत्येकाने कारखाना, सूतगिरणीपासून शिक्षण संस्थापर्यंत सर्व संस्था वाटून घेतल्या आहेत. आता विधानसभा निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून तीनही क्षीरसागरंकडून तरुणांना सूतगिरणी, दूध संघ, विविध शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत," असा आरोप मुळूक यांनी केला.
"क्षीरसागर कुटुंबीय सत्तेत असताना त्यांना जिल्ह्यातील बेरोजगारी दिसली नाही का? निवडणुका आल्या की त्यांना बेरोजगारीची आठवण होते आणि तरुणांना संस्थेवर नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन दिले जाते. निवडणुका समोर ठेवून तीनही क्षीरसागरांकडून तरुणांची नोकरीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक केली जात आहे. यामुळे तरुणांनी आगामी निवडणुकीत मतदानातून क्षीरसागर यांचा हा डाव हाणून पाडावा," असं आवाहन मुळूक यांनी केलं आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.