Political News : किल्लारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावरून चांगलेच रान पेटले होते. औशाचे आमदार अभिमन्यू पवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करावयाचा होता. मात्र, मराठा समाजाने कार्यक्रमाला विरोध दर्शविल्याने आमदार पवार यांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेत फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, स्थानिक मराठा समाजाने आक्रमकपणे विरोध केल्याने ऐनवेळी या कार्यक्रमासाठी नरेंद्राचार्य महाराज यांनी हजेरी लावली.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर मी जात नाही. मात्र, औशाचे आमदार अभिमन्यू पवारांचा फोन आल्याने आलो. ते माझेच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाडके आहेत. त्यांना मंत्री करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना बोलेन. ते जर मंत्री झाले तर या भागाचा कायापालट होऊन हा भाग विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर जाईल, असे प्रतिपादन नानिज येथील नरेंद्राचार्य महाराज यांनी औसा तालुक्यातील किल्लारी येथे केले.
ज्या प्रकारे गोपाळ व गवळणीचा बचाव करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला त्याच पद्धतीने आमदार पवारांनी वीस हजार सभासद असलेला हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहवा, यासाठी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी मी शिफारस करेन, असे प्रतिपादन नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.
शनिवारी त्यांच्या हस्ते किल्लारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र महाराज म्हणाले की, आजारी आणि पंधरा वर्षे बंद असलेला साखर कारखाना अभिमन्यू पवार ( Abhimnyu Pawar) ऊर्जित करीत आहेत. आता सभासदांची आणि येथील शेतकऱ्यांची हा कारखाना जिवंत ठेवण्याची जबाबदारी आहे. अनेक अडचणींचा सामना करीत हा कारखाना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सुरू झाला. अत्यंत पारदर्शक पद्धतीने हा प्रकार सुरू असल्याने यामध्ये विजय मिळाल्याचे सांगत त्यांनी आमदार अभिमन्यू पवार त्यांचे आणि फडणवीसांचे किती लाडके आहेत हे सांगितले. म्हणून त्यांना मंत्रिपद देण्याची मी फडणवीसांकडे शिफारस करणार असल्याचे ते म्हणाले.
..फडणवीसांपेक्षा जास्त गर्दी जमवली...
किल्लारी कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला देवेंद्र फडणवीस यांना आणण्याच्या पवारांच्या प्रयत्नाला येथील मराठा संघटनांनी विरोध दर्शविला होता. हा विरोध टोकाचा वाढत असल्याने आमदार पवारांनी फडणवीसांच्या दौऱ्याला पर्याय शोधला आणि नरेंद्राचार्य महाराजांना आणले. त्यांचे भक्त इतके आहेत की नुसते महाराज किल्लारीला येणार आहेत, असे समजले की भक्तांनी सकाळपासूनच कारखाना साइटवर गर्दी केली. यामुळे आमदार पवारांचे तर शक्तिप्रदर्शन झालेच शिवाय त्यांच्या मंत्रिपदासाठी नरेंद्राचार्य महाराजांसारखा आध्यात्मिक गुरू मिळाला. त्यामुळे आमदार पवारांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे 'चित भी मेरी ओर पट भी मेरा' असेच म्हणावे लागेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.