Beed News, 09 Nov : केंद्रात सत्ता, राज्यातल्या सत्तेत पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे जिल्ह्यातही पक्षाचे संघटन मजबूत करायचे तर आता होणारी नगर पालिका निवडणुक सर्वच ठिकाणी स्वबळावर लढवावी, असा भाजपमधील काही नेते आणि पदाधिकार्यांचा मतप्रवाह आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपलाही स्वबळाशिवाय पर्याय नाही. तर, परळीतही पक्षाने स्वबळ पॅटर्न राबवावा, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, यावर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
जिल्ह्यात बीडसह परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर व गेवराई नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मंत्री पंकजा मुंडेंना पक्षाने जिल्हा निवडणुक प्रभारी तर आमदार सुरेश धस यांना निवडणुक प्रमुख म्हणून नेमले आहे. मागच्या वेळी धारुर, गेवराई नगर पालिकेवर भाजपची सत्ता होती.
तर, बीड, माजलगाव व परळी नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. अंबाजोगाईत त्यावेळी राजकिशोर मोदी यांनी आघाडीच्या माध्यमातून नगर पालिका जिंकली होती. यावेळी अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोदी विरोधात स्वत: नंदकिशोर मुंदडा रिंगणात उतरण्याचे निश्चित मानले जात आहे. तर, गेवराईत सत्तापालटासाठी अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीकडून ताकद लावत संघटन उभारले आहे.
मात्र, भाजपनेही बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांची सांगड घातली आहे. येथून राष्ट्रवादीच्या शितल दाभाडे यांच्या विरोधात भाजपकडून गिता पवार यांचे नाव अंतिम मानले जात आहे. माजलगाव व धारुरमध्येही भाजप तसे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला तुल्यबळ मानले जाते. धारुरमध्ये डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या जोडीला आता माधव निर्मळ आले आहेत.
मुद्दा आहे परळी व बीड नगर पालिकेचा. बीडमध्ये मागच्या काही वर्षांत वरिष्ठ नेत्यांनीच बीडमध्ये भाजप पक्ष वाढीसाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. अलिकडे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, तालुकाध्यक्ष अशोक लोढा, देविदास नागरगोजे आदींनी मंडल समित्या, बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पक्षाची घडी बसविण्याचा चांगला प्रयत्न चालवला आहे.
पण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपपेक्षा राजकीय बलवान असल्याने पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यात बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक मालकं असल्याने युतीती चर्चा करायची तर कोणासोबत असाही पेच असल्याने महायुतीतील रिपाइं व इतर पक्षांसोबत युती करण्यापेक्षा स्वबळावर लढून संघटन आणखी मजबूत करायचे असा दुहेरी मतप्रवाह बीडमध्ये आहे.
परळीत मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाही निवडणुकीत भाजपचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. दरम्यान, महायुतीत दोन्ही पक्ष एकत्र आणि मुंडे भावंडांमध्ये असलेल्या दिलजमाईमुळे परळीत युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरु झाली. तशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही झाली.
दोन दिवसांपासून मनोज जरांगे व धनंजय मुंडे वादाच्या पार्श्वभूमीवर परळीतील भाजपचे स्थानिक पदाधिकारी स्वतंत्र लढण्याच्या प्रयोगाबाबत चाचपणी करत असल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांनी अलिकडेच जरांगेंबाबत मवाळ भूमिका घेतली आहे तर धनंजय मुंडे जरांगे यांच्या विरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळेही परळीतील युतीच्या चर्चेतून भाजप स्वबळाचा प्रयोग करत पदाधिकाऱ्यांना संधी व संघटन मजबूतीसाठी प्रयत्नात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.