Congress News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 13 खासदार निवडून आल्यानंतर हवेत उडालेले काँग्रेसचे विमान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जमिनीवर आले. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षालाही मोठ्या प्रमाणात गळती लागली. राज्यात सत्तांतर होऊन वर्ष उलटले तरी ही गळती काही थांबायला तयार नाही. विशेषतः मराठवाड्यात पक्षांतराचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. परभणी जिल्ह्यातील वजनदार काँग्रेस नेते माजी मंत्री सुरेश वरपूडकर आणि त्या पाठोपाठ जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपाच्या वाटेवर आहेत.
या दोघांच्या पक्ष सोडण्याने जालना आणि परभणी जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वरपूडकर, गोरंट्याल हे दोन्ही नेते आपापल्या जिल्ह्यात वर्चस्व राखून होते. जिल्हा बँक, महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून सुरेश वरपडूकर यांनी विधानसभेत जोर लावला. पाथरी मतदारसंघातून त्यांचा अवघ्या तेरा हजार मतांनी पराभव झाला. तर इकडे जालन्यात कैलास गोरंट्याल यांचा शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांनी तीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. गोरंट्याल यांच्या जिव्हारी हा पराभव लागला, काँग्रेस पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले, नेत्यांनी सभा दिल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी खापर फोडले.
आता या नाराजीतूनच ते भाजपाकडे निघाले आहेत. सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांचा उद्या (ता.29) मुंबईत प्रक्षप्रवेश होत आहे. तर गोरंट्याल यांच्या इच्छेनूसार येत्या चार-पाच दिवसात ते भाजपात प्रवेश करतील. या दोन नेत्यांच्या भाजपा प्रवेशाने मराठवाड्यातील काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केला तर लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यातच काँग्रेसची ताकद होती. पैकी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेला विजय मिळाल्यानंतरही विधानसभेत काँग्रेस पक्षाला खाते उघडता आले नाही.
राजीव सातव यांच्यानंतर हिंगोली जिल्ह्याची धुरा अशोक चव्हाण यांनीच आपल्या खांद्यावर घेतली होती. प्रज्ञा सातव या विधान परिषदेवर असल्याने त्यांचा संपर्क जिल्ह्यात कमी पडतो. परिणामी हिंगोलीवरील काँग्रेसची पकडही सैल झाली आहे. (kailas Gorantayl) कधीकाळी मराठवाड्यावर अधिराज्य गाजवलेल्या काँग्रेसची वाताहत होत असताना राज्य आणि देश पातळीवरचे नेते मात्र याकडे गांभीर्याने पहायला तयार नाहीत.
परभणी, जालन्यात शतप्रतिशतचा नारा..
परभणी जिल्हा बँक, महापालिका, जिल्हा परिषदेत सुरेश वरपूडकर यांच्यामुळे काँग्रेसला प्रतिनिधित्व होते. मध्यंतरी त्यांच्या बँकेतील संचालक पदावर गंडांतर आले होते. कसेबसे ते वाचले तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सत्ताधारी महायुतीसमोर आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर वरपूडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. बोर्डीकरांशी सख्य असल्याने त्याच्या प्रवेशाला फारसा विरोध झाला नाही. शिवाय मेघाना बोर्डीकर या आता राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने संघटनेचे नेतृत्वही त्यांच्याकडेच राहणार आहे.
जिल्हा बँक आणि महापालिकेच्या सत्तेत वाटा मिळावा एवढी माफक अपेक्षा ठेवून वरपूडकरांचा भाजपा प्रवेश झाल्याची चर्चा आहे. या प्रवेशानंतर भाजप महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा आग्रहच मेघना बोर्डीकर, सुरेश वरपूडकर यांच्याकडून धरला जावू शकतो. वरपूडकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला चांगला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे वरपूडकर पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेस जिल्ह्याचे नेतृत्व कोणावर सोपवणार? हा खरा प्रश्न आहे. माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील हे नेते पक्षासोबत असले तरी जिल्ह्यात काँग्रेसला यश मिळवून देऊ शकेल, एवढी त्यांची क्षमता नाही. त्यामुळे काँग्रेसची दुरावस्था झाली आहे.
जालन्यात काँग्रेस एकाकी..
परभणी प्रमाणेच जालन्यात कैलास गोरंट्याल यांच्यामुळे काँग्रेसची कायम नगरपरिषदेवर सत्ता होती. जिल्हा परिषदेतील राजकारणातही या सत्तेचा काँग्रेसला कायम फायदा होत आला आहे. पाच वर्ष गोरंट्याल आमदार राहिल्याने त्या काळात त्यांनी शहरात काँग्रेसची पकड मजबूत केली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मात्र ते बेचैन झाले आणि पराभवाचे खापर पक्षावर फोडत सत्ताधारी भाजपामध्ये जाण्याचा मार्ग निवडला. नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर तिथे आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी गोरंट्याल यांची धडपड सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेली 73 हजार मतं ही आपली वैयक्तिक मते असल्याचा दावा त्यांनी काही दिवसापुर्वी केला होता. यावर काँग्रेस सोडून गेल्यानंतर तुम्हाला तुमची किमंत कळेल, असे त्यांना सुनावण्यात आले होते. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने महायुतीत न लढता स्वबळावर लढावे, असा आग्रह ते धरणार आहेत. गोरंट्याल यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाची मदार खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्यावर असणार आहे. पैकी राठोड हे कधी जनतेत मिसळे नाहीत. तर राजाभाऊ देशमुख यांना भोकरदनची नगर परिषद राखणे महत्वाचे वाटते. अशावेळी काँग्रेस पक्षाला नवे नेतृत्व देऊन आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज करणे पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.