

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजप ऐवजी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. याबाबताच निर्णय अद्याप राज्यपातळीवर प्रलंबित आहे. पण त्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी मिरज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता उलथवली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे आणि शिवसेनेचे स्थानिक नेते मोहन वनखंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत हात मिळवणी केली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत पंचायत समितीत सत्ता स्थापन केली आहे. यात काँग्रेसच्या नरवाड गणातील अवघ्या 21 वर्षांच्या तन्वी कमलेकर या सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. कमलेकर यांनी कवलापूर गणातील भाजपच्या राणी भोरे यांचा 11 विरुद्ध 10 मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची उपसभापती निवड झाली.
मिरज पंचायत समितीमध्ये 2017 मध्ये भाजपने 10 जिंकत 2 अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. यंदाच्या निवडणुकीमध्येही भाजपला 22 पैकी केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 आणि शिवसेनेचे 2 असे 12 सदस्य विजयी झाले होते. महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 15 सदस्य सत्ता स्थापन करतील अशी चर्चा होती. पण घोरपडे आणि वनखंडे यांच्या भूमिकेमुळे सत्तेसाठी चुरस निर्माण झाली होती.
अजित घोरपडे यांनी त्यांचे तिन्ही सदस्य महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे सांगत भाजपला धक्का दिला होता. शिवाय मोहन वनखंडे यांनीही सांगली महापालिकेत सागर वनखंडे यांना डावलल्याचे उट्टे काढले. शिवसेनेचे दोनपैकी 1 सदस्य आज सभापती निवडीवेळी अनुपस्थित राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 आणि शिवसेनेचे 1 अशा 11 सदस्यांनी एकत्र येत सभापती निवडीत भाजपचा पराभव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.