

Mahayuti News : परभणी जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला आहे. विशेषतः भाजप हा जिल्ह्यातील सर्वाधिक ताकदवान पक्ष म्हणून पुढे आला असून महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद जिंकता आलेले नाही. या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय वारे स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला असला तरी भाजपच मोठा भाऊ असल्याचेही आजच्या निकालाने दाखवून दिले आहे.
जिंतूर विधानसभा मतदार संघातील जिंतूर व सेलू या दोन्ही नगरपालिकांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या मतदार संघाचे नेतृत्व पालकमंत्री तथा आमदार मेघना बोर्डीकर करत असून, त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे या निकालांमधून अधोरेखित झाले आहे. एकाच मतदार संघातील दोन्ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात जाणे ही पक्षासाठी मोठी राजकीय कामगिरी मानली जात आहे.
महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मानवत व गंगाखेड या दोन नगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे. तरी एकूण राजकीय चित्रात भाजपच सरस ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्णा नगरपालिकेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेच्या उमेदवाराने विजय मिळवत स्थानिक पातळीवरील ताकद दाखवून दिली आहे. मात्र आमदार रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड नगराध्यक्ष पदाचा पराभव स्विकारावा लागला आहे.
पाथरी नगरपालिकेत शिवसेनेच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पद पटकावले असले, तरी सोनपेठ नगरपालिकेतील निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पाथरी विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार राजेश विटेकर यांना मतदार संघातच मोठा धक्का बसला असून त्यांचे स्वतःचे गाव असलेल्या सोनपेठ नगरपालिकेत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. येथे शहर विकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
एकूणच या निकालांमधून परभणी जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून विरोधकांसाठी ही निवडणूक स्पष्ट इशारा मानली जात आहे.
जिल्ह्यातील सातही नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकही जागा मिळू शकलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व या निवडणुकांत नामशेष झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याच पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी त्यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्राणी यांचा पराभव झाला आहे. पूर्णेत शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे गट) उमेदवार पराभूत झालेल्या आहेत. खासदार संजय जाधव यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.