मराठवाड्यात झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसेनेशी युती नको अशी मागणी केली.
भाजप नेते स्वबळावर स्थानिक निवडणुका लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
शिवसेनेने मात्र युती कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असून दोन्ही पक्षांत तणाव वाढला आहे.
Marathwada Political News : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका एकत्र लढले, महाराष्ट्राच्या सत्तेतही सोबत आहेत, पण तरीही शिवसेना-भाजपामधील पदाधिकाऱ्यांची मनं मात्र जुळली नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी महायुतीही सज्ज झाली आहे. मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी, महापूर, शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नूकसान आणि त्यासाठी सरकारने जाहीर केलेली 31 हजार कोटींचे पॅकेज या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेने स्थानिक निवणूकीची चाचपणी केली.
राज्यात सत्ता आणि युतीत एकत्र असले तरी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र भाजपाला वाटेकरी नको आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या मराठवाडा विभागीय आढावा बैठकीत खासदार, आमदार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जो सूर काढला तो स्वबळाचाच होता. मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली वगळता इतर सगळ्या जिल्ह्यात भाजपाची मोठी ताकद आहे.
खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर शिवसेना (Shivsena) सोबत नकोच, अशी रोखठोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. हा मूड पाहून मग फडणवीसांनीही एकत्र लढण्याच्या आपल्या इच्छेला काहीसा आवर घालत स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार दिले जातील, असे स्पष्ट केले. शिवसेना-भाजपाची नैसर्गीक युती असली तरी तीचे आता दोन तुकडे भाजपानेच पाडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- मुंडे-महाजनांच्या काळातील युती आणि आजची युती यातील फरक स्पष्टपणे दिसतो आहे.
इच्छा नसतांना वरिष्ठ पातळीवर शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झालाच, तर मग एकमेकांना पाडण्यासाठीच शक्ती खर्च केली जाईल, असे चित्र आहे. मराठवाड्यात भाजपाला तशी कोणाची स्पर्धा नाही, त्यांचे संघटन मजबूत आहे. या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फटका बसू शकतो. याची जाणीव भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांना आहे. त्यामुळेच भाजपा स्थानिक निवडणुकींसाठी शिवसेनेला सोबत घेण्यास इच्छूक नाही.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे व त्यांचे मंत्री युती झालीच पाहिजे, हवं तर काही जागा जास्त घ्या, असं बोलताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय शिरसाट यांचा सूर युतीचाच होता. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जळगांवमध्ये युतीसाठी काही जांगावर तडजोडीची भूमिका घेतली आहे. एकंदरित हे चित्र पाहिले, तर आता शिवसेनेला सोबत घ्यायचे की नाही? याचा निर्णय शतप्रतिशत भाजपाच घेणार एवढे मात्र निश्चित.
उद्धवसेनेला सहानुभूती ?
फडणवीस-शिंदे यांची एकत्र लढण्याची कितीही इच्छा असली तरी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्या्ंच्या मनात वेगळंच सुरू आहे, हे काल झालेल्या बैठकीतून दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईसाठी 'हंबरडा' फोडत नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
सरकारने जाहीर केलेले पॅकेज कसे फसवे आहे? जुन्याच मदतीचा समावेश करून आकडा कसा फुगवण्यात आला हे उद्धवसेनेचे नेते गावागावत जाऊन सांगत आहेत. निश्चितच याचा काही प्रमाणात सत्ताधारी महायुतीला बसू शकतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या आढाव बैठक आणि शिवसेनेच्या मेळाव्यातही याबाबतची चाचपणी करण्यात आली. आता धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपाकडून कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखला जातो, की मग एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलेल्या आणि कायम एकत्र राहण्याचा दिलेला शब्द पाळतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
1. मराठवाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली?
भाजप पदाधिकाऱ्यांनी स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची आणि शिवसेनेशी युती न करण्याची मागणी केली.
2. ही मागणी कोणासमोर केली गेली?
ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली.
3. शिवसेनेची भूमिका काय आहे?
शिवसेना मात्र युती कायम ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि एकत्रितपणे निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
4. या घडामोडींचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
भाजप-शिवसेना युतीत तणाव वाढण्याची आणि आगामी स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जाण्याची शक्यता आहे.
5. मराठवाड्यातील कोणत्या निवडणुका येत्या काळात आहेत?
मराठवाड्यात अनेक नगरपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.