

Latur ZP News : अमित देशमुख यांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी ठेकदार, टँकर, वाळू माफियांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली त्याकडे बघावे. जास्त बोलाल तर आम्हाला सगळंच काढावं लागेल? वडीलाच्या जीवावर तुमचं राजकारण किती दिवस चालणार? जरा स्वतःच कर्तृत्व दाखवा, अशा शब्दात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना डिवचले.
जिल्हा परिषदेच्या प्रचारात आता नेत्यांचा कलगितुरा चांगलाच रंगू लागला आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख आणि भाजपचे अभिमन्यू पवार एकमेकांवर तुटून पडले आहेत. औसा तालुक्यातील एका जाहीर सभेत अमित देशमुख यांनी अभिमन्यू पवार यांचा ठेकेदार आमदार असा उल्लेख केला. भाजपने गुत्तेदार, कंत्राटदारांना तिकीटं दिली आहेत. आमदारच ठेकेदार झाला की अशी परिस्थिती येते, असा आरोप अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात केला.
लोकांच्या मतांवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा भाजप प्रयत्न करते आहे. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या गोष्टी असल्याची टीका देशमुख यांनी केली होती. त्याला अभिमन्यू पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ठेकेदार, गुत्तेदारांना नाही तर आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. तुम्ही ठेकेदारांना, टँकर, वाळु माफियांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जास्त बोलायला लावू नका.
आम्ही शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना काढला आणि तोही सहकारात ठेवला, असा टोलाही पवार यांनी देशमुखांना लगावला. वडीलांच्या जीवावर तुमचं किती दिवस चालणार? जरा स्वतः कर्तृत्व दाखवा, असे म्हणत अभिमन्यू पवार यांनी अमित देशमुख यांना डिवचले. लातूर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
लातूर महापालिकेत अमित देशमुख यांच्या काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत बहुमतासह सत्ता मिळवली. भाजपचे महापालिकेत पुन्हा हिरो होण्याचे स्वप्न त्यामुळे भंगले. आता जिल्हा परिषदेतही भाजपला धूळ चारण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे भाजपला महापालिका निवडणुकीतील अपयश जिल्हा परिषदेत सत्तेला गवसणी घालत धुवून काढायचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.