

Chhatrapati Sambhaji Nagar news : छत्रपती संभाजीनगर भाजपचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात सापडलेल्या एका बेवारस बॅगमध्ये चक्क पिस्तूल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही बॅग नेमकी कोणाची आहे ती इथे कोणी आणून ठेवली? यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसली तरी पोलिसांनी ही बेवारस बॅग ताब्यात घेतली असून याचा तपास सुरू आहे.
भाजपा आमदार संजय केणेकर यांचे शहरातील क्रांती चौक भागात संपर्क कार्यालय आहे. सकाळपासूनच या कार्यालयामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हे केणेकर यांना भेटायला येत असतात . त्यामुळे येथे कायम गर्दी असते. शुक्रवारी (ता.13) रात्री संपर्क कार्यालयातून बाहेर पडत असताना परिसरातील एका कोपऱ्यात एक बॅग पडलेली त्यांच्या कार्यालय सहाय्यक यांनी पाहिली.
तेव्हा भेटायला आलेल्या एखाद्या नागरिकाची किंवा आपल्याच पदाधिकारी, कार्यकर्त्याची ही बॅग विसरली असावी असे समजून आमदार संजय केणेकर यांनी ती कार्यालय सहाय्यकाला आत सोफ्यावर ठेवण्यास सांगितली. संपर्क कार्यालयातील सोफ्यावर रात्रभर ही बॅग ठेवण्यात आली.
आज सकाळी जेव्हा कार्यालयीन सहायकाने ही बॅग उत्सुकतेपोटी उघडून पाहिली तर समोरच्या कप्प्यामध्ये चक्क पिस्तूल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती आमदार संजय केणेकर यांना दिली. त्यानंतर ती बॅक काल ज्या जागेवर होती त्याच जागेवर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि काही वेळातच संजय केनेकर हे ही कार्यालयात आले.
बॅगमध्ये सापडलेले पिस्तूल हे एअर गन असल्याचे आता समोर आले आहे. संजय केणेकर यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेत याचा तपास सुरू केला आहे.
आमदार संजय केनेकर हे सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेऊन आपली मतं आक्रमकपणे मांडत असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच कार्यालयामध्ये पिस्तूल असलेले बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता नेमकी ही बॅग कोणाची? ती तो इथे विसरली की मुद्दाम कोण व्यक्ती सोडून गेला? बॅगमध्ये असलेले पिस्तूल हे अधिकृत आहे की बेकायदेशीर? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानंतरच हा नेमका प्रकार काय आहे? हे समोर येईल.