

Jalna Alliance News : शिवसेना-भाजप या सत्तेतील दोन पक्षांमध्ये महापालिकेतील युतीवरून प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचे समोर येऊ लागले आहे. जालन्यात युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नेत्यांच्या बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायला काही तास शिल्लक असल्याने इच्छुकांची व कार्यकर्त्यांची घालमेल आता वाढू लागली आहे. यातून कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनी आता चक्क शिवसेनेसोबत युती नकोच, अशी भूमिका घेतली आहे.
युती झाली तर आम्ही सामुहिक राजीनामे देऊ, वेळप्रसंगी आत्मदहन करू, असा कडक इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. जागा वाटप आणि युतीच्या बोलणीसाठी आतापर्यंत झालेल्या सगळ्या बैठका या निष्फळ ठरल्या आहेत. शिवसेनेसोबत युती नको, अशी सुरवातीपासून कैलास गोरंट्याल यांची मागणी होती. परंतु राज्य पातळीवर युती करा, असे आदेश आल्यामुळे इच्छा नसताना युतीसाठी दोन्ही बाजुंनी बैठकांचा सोपस्कार पाडला गेला. रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे, भास्कर आंबेकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्यात बैठका झाल्या. पण अद्याप युतीचा निर्णय झाला नाही.
दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये युती फायनल झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा आघाडीचा प्रयत्न होता. पण अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आली तर आम्ही आघाडीतून बाहेर पडू, अशा इशारा काँग्रेसने दिला होता. युतीचे काहीच ठरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने बी प्लाॅन म्हणून आघाडीसोबत जाण्याचा पर्याय शिल्लक ठेवला होता.
परंतु अरविंद चव्हाण यांनी आम्ही युतीसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज सकाळापासून भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या घरासमोर कैलास गोरंट्याल समर्थक माजी नगरसेवकांनी गर्दी केली होती. ज्या अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केले, त्या खोतकर यांच्या शिवसेनेसोबत महापालिकेसाठी अजितबात युती नको. आपण स्वबळावर सर्वाधिक नगरसेवक निवडून आणू शकतो, भाजपचा महापौर बसवू शकतो, असा दावा या नगरसेवकांनी केला.
युती झाली तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मग आम्ही काय कायम सतरंज्याच उचलायच्या क? असा संतप्त सवालही एका कार्यकर्त्याने केला. शिवसेनेसोबत भाजपने युती केली तर आम्ही सामुहिक राजीनामे, देऊ असे सांगतानाच एका कार्यकर्त्याने तर आपण सोबत राॅकेलचा डबा घेऊन आलो आहोत, युतीचा निर्णय झाला तर आपण आत्मदहन करणार आहोत, असा इशाराच दिला आहे. एकूणच जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील युतीचा निर्णय काही होतान दिसत नाहीये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.