

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : भाजपाने कधी नव्हे ते छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठे यश मिळवले. स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत शतप्रतिशत सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येत्या 10 तारखेला महापौर, उपमहापौरपदाची निवड केली जाणार आहे. तर आज महापालिकेतील गटनेत्याच्या नावावर देखील शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले आहे.
काल रात्री भाजपाच्या सगळ्या नगरसेवकांना शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन देण्यात आले. त्यावेळी दोन्ही नेते उपस्थितीत होते. जेवण दिल्यानंतर गटनेते पदाची घोषणा आणि महापौर, उपमहापौर पदाची निवड होईपर्यंत एकाही नगरसेवकाने शहर सोडून जाऊ नये, अशी सक्त ताकीद यावेळी नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संभाजीनगर महापालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होईपर्यंत कुठली रिस्क ने घेण्याचे ठरवले आहे.
भाजपाला बहुमतासाठी केवळ एक जागा कमी असली तरी नगरसेवकांमध्ये फूट पडण्याची शक्यता नसल्याने पक्षाने सहलीचा पर्याय टाळल्याचे बोलले जाते. महापौर पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा असल्याने सव्वा सव्वा वर्षाचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये ही राबवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज भाजपच्या महापालिकेतील महापौर, उपमहापौर, गटनेता व सभागृहनेता पदांसाठी स्थानिक कोअर कमिटीने आठ नावांची यादी प्रदेश स्तराकडे पाठवली आहे. या नावांवर मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
शहर जिल्हाध्यक्षांकडून या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, गटनेतेपदावरून स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने निर्णय प्रदेशाकडे सोपवण्यात आला आहे. महापौरपदासाठी सुरू असलेल्या लॉबिंगवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे चांगलेच संतापले होते. काही स्थानिक नेते प्रदेश नेतृत्वाला वेगवेगळी माहिती देत असल्याचे निदर्शनास येताच चव्हाण यांनी त्यांना चांगलेच खडसावले होते.
महापौर पदासाठी आतापर्यंत डझनभर नावांची चर्चा सुरू होती. यात प्रामुख्याने महेश माळवदकर, समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, अनिल मकरिये यांच्या नावाचा समावेश होता. आता या यादीतून बरीच नावे मागे पडली असून समीर राजूरकर, अनिल मकरिये या दोघांमध्येच स्पर्धा असल्याची माहिती आहे. भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एका नावाचा आग्रह धरल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.