Raosaheb Danve and Vidhan Parishad: मराठवाड्यातील 'डॅमेज कंट्रोल'साठी भाजप रावसाहेब दानवेंना विधानपरिषदेवर पाठवणार?

Marathwada BJP Politics : महाराष्ट्रात घटलेली खासदारांची संख्या आणि मराठवाड्यात कोरी झालेली पाटी पाहता भाजपला इथे डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आहे.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama

Maharashtra Legislative Council Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संख्याबळानूसार भाजपचे चार उमेदवार निवडून येतील असे बोलले जाते. त्यादृष्टीने भाजपकडून काही संभाव्य नावांची चर्चा होतांना दिसते आहे.

यात प्रामुख्याने मराठवाड्यातील दोन नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ही ती दोन नावे आहेत.

आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य आणि विशेषतः मराठवाड्यातील वातावरण सध्या तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका भाजप(BJP) महायुतीला बसला आहे. महाराष्ट्रात घटलेली खासदारांची संख्या आणि मराठवाड्यात कोरी झालेली पाटी पाहता भाजपला इथे डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांची नावे महत्वाची समजली जातात.

रावसाहेब दानवे यांचा विचार केला तर त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि लोकांमधील लोकप्रियता पाहता त्यांच्या पुनर्वसनाचा फायदा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो.

लोकसभेला झालेला त्यांचा पराभव हा एका विशिष्ट राजकीय परिस्थीतून झाला. विधानसभेला वेगळे चित्र असू शकते, अशावेळी रावसाहेब दानवे यांच्यासारखा अनुभवी नेता राज्याच्या राजकारणात असला तर याचा निश्चितच पक्षाला, महायुतीला फायदा होईल, असे बोलले जाते.

Raosaheb Danve News
Raosaheb Danve News : अमित शाहांचा 'भला आदमी' रावसाहेब दानवे आता 'बडा आदमी' होणार !

पक्षाचा आदेश आणि वरिष्ठ सांगतील ते काम करण्याची तयारी असल्याचे रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी आधीच जाहीर केले आहे. अशावेळी रावसाहेब दानवे यांची विधान परिषदेसाठी चर्चा हे शुभ संकेत मानले जात आहेत. गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती, दोन वेळा आमदार, पाच वेळा सलग खासदार, केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री पदाची जबाबदारी असा त्यांचा चढता आलेख राहिला आहे.

दरम्यान, भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना एकदा केंद्रातील राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगून राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले होते. संघटनेच्या राज्याच्या महत्वाच्या पदावर असतांना राज्यात दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत घवघवीत यश मिळवले होते. भाजपसाठी रावसाहेब दानवे यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा काळ सर्वाधिक यश देणारा ठरला होता.

Raosaheb Danve News
Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेतील विजयानंतर खासदार भुमरे-कराड अन् दानवे पहिल्यादांच एकत्र..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांचे विश्वासू म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात. दानवे यांनी लोकसभेतील पराभवानंतर नव्याने पक्ष कार्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात संवाद दौरा करत ते भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करत आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता जोमाने कामाला लागा, या त्याच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांना धीर आल्याचे चित्र त्यांच्या दौऱ्यातून दिसून आले होते. भाजपचा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुजन चेहरा म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे बघितले जाते. विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो.

Raosaheb Danve News
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे विधानसभेच्या आखाड्यात उतरून अब्दुल सत्तारांचा वचपा काढणार?

भाजप शिवाय मित्र पक्ष व इतर पक्षातील नेत्यांशी दानवे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दानवे यांचा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असणारा संपर्क, संघटन कौशल्य पाहता भाजपचे लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्यास निश्चितच मदत होऊ शकते, असेही बोलले जाते.

अर्थात दिल्ली आणि राज्य पातळीवरून विधान परिषदेच्या चार जागांसाठी दहा नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते? यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे. विधान परिषद किंवा राज्यसभेतून म्हणजेच मागच्या दारातून कुठलेही पद घेणार नाही, अशी भूमिका दानवे यांनी घेतली आहे. पण पक्षाने आदेश दिला तर तो दानवे यांना मान्य करावा लागेल. येत्या काही दिवसात विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागते हे स्पष्ट होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com