Shivsena UBT News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चाळीसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गुलमंडीवर सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. यावेळी अंबादास दानवे हेह आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हातात हात धरून गाण्यावर थीरकले. हे चित्र पाहून दोघांच्याही समर्थकांना हायसे वाटले.
छत्रपती संभाजीनगर आणि एकूणच मराठवाड्यातील शिवसेनेच्या वाटचालीत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) ,अंबादास दानवे या दोन नेत्यांचे योगदान मोठे आहे. परंतु गेल्या काही वर्षात या दोघांमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष अनेकदा उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोघांमधील वाद इतक्या टोकाला गेले की एकमेकांशी संपर्क आणि समोरासमोर येण्याचे ही ते टाळत होते. चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयात क्वचितच गेल्या कित्येक वर्षात दानवे गेले असतील. तर चंद्रकांत खैरे यांनी अजूनही अंबादास दानवे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या मातृभूमी प्रतिष्ठानमध्ये पाय ठेवलेला नाही.
दोन वेळा आमदार, मंत्री आणि सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचे मातोश्रीवर मोठे वजन होते. तर गेल्या दहा वर्षात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी छत्रपती संभाजीनगर व जिल्ह्यात संघटनात्मक पायाभरणी करत उद्धव ठाकरे यांचे मन जिंकले. चंद्रकांत खैरे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी अंबादास दानवे यांनी उमेदवारी वर दावा केला होता. त्या आधीपासूनच खैरे - दानवे यांच्यात खटके उडत होते. लोकसभेच्या उमेदवारीवरील दाव्यानंतर या दोघांमधील संघर्ष अधिकच चिघळला.
खैरे यांनी वारंवार अंबादास दानवे यांच्यावर जाहीर आरोप केले. तर दानवे यांनी मात्र आपले गाऱ्हाणे उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडत माध्यमांसमोर बोलणे टाळले. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे यांची सहानुभूती काही प्रमाणात त्यांच्या वाट्याला आली. तर सलग दोन पराभव झाल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे मातोश्री वरील भजन काही प्रमाणात घटले. परंतु शिवसेना फुटल्यानंतर पक्षाशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे खैरे यांचा कार्यकर्त्यांमध्ये असलेला मान अधिकच वाढला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही खैरे यांचा सन्मान राखण्याच्या सूचना देत दानवे आणि खैर यांच्यामधील संघर्षाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी केला.
त्यानंतर पाण्यासाठी झालेला 'लबाडांनो पाणी द्या' या आंदोलनात खैरे- दानवे दोघेही स्वतंत्रपणे उतरले. शहराच्या वेगवेगळ्या भागात बैठका, आंदोलना करत पक्षाचा आदेश त्यांनी पाळला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता पक्षाच्या वतीने मराठवाड्यात ' क्या हुआ तेरा वादा' हे जन आंदोलन सुरू आहे. सत्ताधारी मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या घरी, कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन देण्याच्या या आंदोलनाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. अशातच शिवसेना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या चाळीसाव्या वर्धापनदिनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले.
सत्यनारायणाच्या महापूजेत सहभागी होत दोघांनी एकमेकांशी संवादही साधला. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ' बिलनची नागिन निघाली' या गाजलेल्या गाण्यावर दानवे आणि खैरे यांनी हातात हात घालत डान्स केला. दोघांच्याही देहबोलीतून त्यांचे मनोमिलन झाल्याचे संकेत मिळत होते. संभाजीनगर महापालिकेवरची सत्ता कायम राखायची असेल तर अंतर्गत मतभेद, हेवेदावे बाजूला सारून काम करावे लागेल याची जाणीव बहुदा दोघांनाही झाली असावी, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.