
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती आता मोठे स्वरुप धारण करू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत महापौर पद भुषवलेले बहुतांश लोक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखलेले माजी महापौर घोडेले दाम्पत्य आणि ज्यांना खैरेंच्या आग्रहामुळे महापौर पद मिळाले होते त्या कला ओझा याआधीच पक्ष सोडून गेल्या आहेत.
घोडेले दामप्त्यांने पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी आता शिंदेसेनेच्या वाटेवर असलेल्या दहा ते बारा नगरसेवकांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काल शहरात 'माँसाहेब' मीनाताई ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या (Shivsena) वतीने साजरी करण्यात आली. शहरातील गुलमंडी येथे दरवर्षी प्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ज्या माजी नगरसेवकांच्या पक्ष सोडून जाण्याची चर्चा होत आहे ते सगळे उपस्थित होते.
हीच संधी साधत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा या माजी नगरसेवकांची मनधरणी केली. तिकडे जाऊ नका, स्वतःचे नुकसान करुन घेऊ नका. आपण पुन्हा उभारी घेऊ, महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच भगवा फडकणार आहे, असा विश्वास खैरे त्यांना देत होते. 'माँसाहेब' मीनाताई ठाकरे यांची जयंती असल्याने त्यांची शपथ घ्या आणि पक्ष सोडून जाणार नाही, हे सांगा असे आवाहनही खैरे यांनी या माजी नगरसेवकांना केल्याची चर्चा आहे.
महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. तीन महिन्यांनी या निवडणुकीला सामोरे कसे जायचे? असा प्रश्न आता खैरेंना सतावू लागला आहे. निम्मा पक्ष रिकामा झाला आहे, तर उर्वरित पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. अशावेळी शिवसेनेचा नेता म्हणून त्यांना रोखण्याची जबाबदारी खैरे यांनी घेतली आहे.
आता सत्ताधारी शिवसेनेच्या वाटेवर असलेले हे माजी नगरसवेक खैरेंचे ऐकतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी वेळ मागणार असल्याचे बोलले जाते.
वेळ मिळताच या माजी नगरसेवकांचा मुंबईत प्रवेश आणि त्यांनतर संभाजीनगरात मोठा सोहळा आयेजित करण्याचा स्थानिक नेत्यांचा विचार आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात पक्षातून आऊटगोईंग सुरू झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी याकडे आता गांभीर्याने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. परंतु त्याला आता खूप उशीर झाल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.