Shivsena UBT : एकीकडे ज्या नेत्यांनी गेली 30-35 वर्ष एकाच पक्षात, एकत्र काम केले ते आज एकमेकांचे वस्त्रहरण करत आहेत. पद, उमेदवारीसाठी पैसे, गाड्या घेतल्याचा आरोप करत राजकीय चिखलफेक सुरू आहे. अशातच एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याने चाळीस वर्ष एकाच पक्षात कार्यरत असलेल्या नेत्याच्या निष्ठेचे कौतुक करावे हे राजकारणात क्वचितच घडते. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील याला अपवाद ठरले आहेत.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरला हादरा दिला होता. सलग चार वेळा विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी चमत्कारिकरित्या पराभव करत नाव इतिहास रचला होता. तेव्हापासून खरं पाहिलं तर खैरे इम्तियाज यांचा द्वेष करत होते. ते कसे जातीयवादी आहेत? त्यांच्यामुळे जिल्हा आणि शहरातील वातावरण बिघडले, दंगली, गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप सातत्याने खैरे यांच्याकडून केले गेले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ही जागा जिंकली. सध्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि इम्तियाज जलील हे माजी खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात गळती लागली आहे, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लागोपाठ पराभव झाल्याने एमआयएम पक्षात काहीसे उदासीन वातावरण आहे.
विधान परिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एक पद देण्यासाठी दोन मर्सिडीज कार घेतल्या जात होत्या असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. यावरून दोन्ही सेनेमध्ये घमासान सुरू आहे. अशावेळी इम्तियाज जलील यांनी मात्र आपले राजकीय विरोधक असलेल्या चंद्रकांत खैरे यांचे कौतुक केले. खैरे यांच्या प्रामाणिकतेला आणि पक्ष निष्ठेला मी सलाम करतो, असे गौरवोद्दगार इम्तियाज यांनी काढले.
आजच्या राजकारणात जी प्रामाणिकता आणि नैतिकता पाहिजे ती चंद्रकांत खैरे यांनी दाखवून दिलेली आहे. पक्षाचीनिष्ठा बाळगत ते प्रामाणिक राहिले. लोकसभेच्या पराभवानंतर ते दुसर्या पक्षात जाऊ शकत होते मात्र त्यांनी तसे केले नाही. मी त्यांचा राजकीय विरोधक असलो तरीही त्यांच्या याच गोष्टीचा मी कौतुक करतो. बाळासाहेब ठाकरेंनी खूप लोकांना मोठं केलं. मात्र वेळ आल्यावर याच लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खूपसला. महाराष्ट्र मध्ये एकेकाळी जी नैतिकता होती ती आता संपलेली आहे, अशी खंतही इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.