

Shivsena UBT News : माजी महापौर रशीद खान उर्फ मामू यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात पुन्हा तानातानी सुरू झाली आहे. आपल्याला या प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. थेट मातोश्रीवर नेऊन त्यांचा प्रवेश झाल्यानंतर वृत्तपत्र आणि चॅनलवरील बातम्यांमधूनच मला समजले, असा दावा खैरे यांनी केला.
ज्या रशीद मामूने शिवसेनेच्या मोर्चावर मशीदीतून दगडफेक केली होती, अशा माणसाला दिलेला पक्षप्रेवश मला मान्य नाही. तो पक्षात आला असला तरी त्याला मी उमेदवारी मिळू देणार नाही, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुमार कामगिरी पाहता शिवसेनेचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यात काही प्रयोग सुरू केले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट आणि त्यानंतर महापालिकेत जातीय समीकरण जुळवण्यासाठी माजी महापौर रशीद खान उर्फ मामू यांना थेट पक्ष प्रवेश हा त्याचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या दोन्हीवेळी अंबादास दानवे यांनी पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना अंधारात ठेवल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश मिळवून देत आमचा पक्ष मुस्लिमविरोधी नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पण दानवे यांचा हा प्रयोग चंद्रकांत खैरे यांना खटकला आहे. आपल्या अंधारात ठेवून रशीद मामूला पक्षात प्रवेश मिळाला असला तरी मी त्यांना उमेदवारी मळू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका खैरे यांनी घेतली आहे. यातून पुन्हा एकदा दानवे-विरुद्ध खैरे वाद चव्हाट्यावर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिवालय या पक्ष कार्यालयात महापालिका निवडणुक इच्छुकांच्या मुलाखती मुंबईतून आलेल्या नेत्यांनी घेतल्या. यावेळी शिवालयात चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे उपस्थित होते. यावेळी खैरे यांना भेटण्यासाठी आलेल्या रशीद मामू यांना त्यांनी भेट नाकारली.
याआधीही रशीद खान यांनी आपल्याला सहावेळा फोन केला, पण आपण तो घेतला नाही. ज्या माणसाने शिवसेनेने 1986 मध्ये काढलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या मोर्चावर सिटीचौकातील मशिदीतून दगडफेक केली, अशा माणसाला पक्षात प्रवेश द्यायचा आणि तो आम्ही मान्य करायचा? असा सवाल खैरे यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मुलाखत देण्यासाठी आलेल्या रशीद मामू यांना खैरे यांनी तोंडावर माझा तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचे सांगून टाकले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. त्यानंतरही खैरे यांनी त्यांच्या प्रेवशाला आपला ठाम विरोध दर्शवला आहे. कुठल्याही परिस्थितीत मी त्याला तिकीट मिळू देणार नाही, मिळाले तर मग बघा मी काय करतो? असा इशाराही खैरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती दिली गेली, त्यामुळे तो प्रवेश झाला. त्याच्या प्रवेशाने आमच्या पन्नास हजार मतांचे नुकसान होणार आहे. मामू पार्टी म्हणून आमची टिंगल विरोधक उडवत आहेत. शिवसेनेच्या वतीने 1986 मध्ये आम्ही मोर्चा काढला होता, त्यावेळी रशिद मामू यांनी मशिदीतून सिटी चौकात मोर्चावर दगडफेक केली होती. माझ्या पत्रानंतर रशिद मामू एक वर्ष जेलमध्ये गेले, मला सहा वेळा फोन केला पण त्यांना शिवालयाची पायरी चढू दिली नाही. आजही भेट घेण्याचा प्रयत्न केला मी त्यांना झिडकारून लावले. अशा दंगेखोर माणसाची आम्हाला गरज नसल्याचेही खैरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.