Lok Sabha Election 2024 : मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचे गारुड चालले ते मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात. हिंदू-मुस्लिम तणावाची पार्श्वभूमी असलेल्या या शहरात शिवसेनेला पदार्पणातच घवघवीत यश मिळाले. या यशातील एक शिलेदार म्हणून चंद्रकांत खैरे यांचे नाव समोर येते. (Latest Marathi News)
स्वातंत्र्यसैनिकाच्या सामान्य कुटुंबात जन्म, पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन डेक्कन फ्लोअर मिलमध्ये सुपरवायझर म्हणून खैरे यांनी कामाला सुरूवात केली. पण कट्टर हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना खुणावत होते. मराठवाड्यातील पहिली शिवसेना शाखा स्थापन करण्यासाठी खैरेंनी हिरीरीने पुढाकार घेतला.
शिवसेना या चार अक्षरांची जादू अशी काही चालली की, पक्षाचा साधा पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केलेले चंद्रकांत खैरे संभाजीनगरमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले. पहिला हिंदू आमदार होण्याचा मान मला मिळाला, असे आजही ते अभिमानाने सांगतात. राज्यात 1995-99 च्या युती सरकारमध्ये गृहनिर्माण, वने व पर्यावरण, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी खैरेंना मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेली श्रद्धा आणि निष्ठा या जोरावर खैरे सलग 1999 ते 2014 असे चार वेळा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.
चंद्रकांत भाऊराव खैरे
1 जानेवारी 1952
पदवीधर, (कार्मिक व्यवस्थापन पदविका पूर्ण )
वडील कै. भाऊराव खैरे (स्वातंत्र्यसैनिक), आई वत्सला भाऊराव खैरे (स्वातंत्र्य सैनिक), भाऊ कै. सूर्यकांत खैरे (एपीआय कंपनीत नोकरी, वरूड समाजाचे असल्याने अत्यंविधी साहित्य विक्रीचा व्यवसाय करायचे). दोन बहिणी, पत्नी वैजयंती खैरे (गृहिणी व राजकारणातही सक्रिय). त्यांना दोन मुलगे आहेत. त्यापैकी पवन यांचे निधन झाले आहे. पुत्र ऋषीकेश हे माजी नगरसेवक आहेत. दोन मुली असून, त्या विवाहित आहेत. पुतणे सचिन सूर्यकांत खैरे हेही माजी नगरसेवक आहेत.
चंद्रकांत खैरे हे उद्योजक आहेत. वाळूज एमआयडीसीमध्ये त्यांचा छोटा कारखाना आहे. शहरालगतच्या कांचनवाडी भागात एक सैनिकी शाळाही ते चालवतात.
छत्रपती संभाजीनगर (आधीचा औरंगाबाद)
शिवसेना (ठाकरे गट)
चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख पदापासून राजकारणाला सुरुवात केली. 1988 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली तेव्हा खैरे हे गुलमंडी वार्डातून लढले होते. नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती. 1990 मध्ये पक्षाने त्यांना थेट विधानसभेची उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत खैरेंनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्यांदाही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. 1995-99 या काळात राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. या सरकारमध्ये खैरे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.
गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा आणि नागरी जमीन कमाल मर्यादा, परिवहन, पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. दोनवेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये सलग चारवेळा ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. खैरे यांच्या विजयातील सातत्य पाहता पक्षाने त्यांना संसदीय नेता म्हणूनही जबाबदारी दिली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ESIC) स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या शिवाय संसदेच्या विविध समित्यांमध्ये खैरे यांना स्थान मिळाले होते.
2005 ते 2018 या दरम्यान शिवसेना पक्षात खैरे यांना उपनेतेपदी बढती देण्यात आली होती. मराठवाड्यातील लातूर, धाराशीव, बीड या जिल्ह्यांतील संघटनात्मक बांधणीची जबाबदारी खैरे यांच्यावर होती. 2018 मध्ये खैरे यांना उपनेते पदावरून नेतेपदावर बढती देण्यात आली आणि त्यांचे पक्षात वजन वाढले.
कपाळी केशरी टिळा, गळ्यात भगवा रुमाल, छातीवर धनुष्यबाणाचे चिन्ह घेऊन खैरे यांनी दिल्ली आणि सभागृह गाजवल्याचे अनेकदा दिसून आले. बाळासाहेबांच्या निधनानंतर खैरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही जुळवून घेतले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा धक्कादायक पराभव झाला. पण आजही ते खासदार असल्यासारखेच वावरतात, त्यांच्या जनसंपर्कात वागण्यात, बोलण्यात कुठलाही बदल झालेला नाही. धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे राजुरेश्वर गणपती, महादेव, भद्रा मारोतीचे दर्शन आजही त्याच भक्तीभावाने घेतात. शिवसेना फुटली, पण खैरे पक्षाशी, उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. या निष्ठेचे फळ त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत सहाव्यांदा उमेदवारीच्या रूपात मिळण्याची दाट शक्यता आहे.
आजही न चुकता दर गुरू पौर्णिमेला खैरे मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर दर्शनासाठी जातात. या शिवाय शिवसेनेतील आपल्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांचेही खैरे दर्शन घेतात. मराठवाड्यात शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून खैरे कार्यरत होते, पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेत भरले आणि त्यांनी खैरेंना गल्लीतून दिल्लीपर्यंत नेले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, मधुकर सरपोतदार, विलास भानुशाली, लिलाधर डाके, सुभाष देसाई या शिवसेनेच्या नेत्यांशीही खैरे यांचा संपर्क आणि संबंध आला. मोठ्यांचा आदर आणि त्यांच्या पाया पडण्याच्या सवयीमुळे खैरे सगळ्यांनाच चांगले लक्षात राहत असे.
चंद्रकांत खैरे हे धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे अशा कार्यांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. राजूरच्या राजूरेश्वर मंदिरात ते सढळ हस्ते अन्नदान व आर्थिक मदत करतात. या शिवाय दरवर्षी वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात श्रावण मासात खैरे सपत्नीक, कुटुंबासह पूजा-अर्चा, अभिषेक आणि ब्रम्हवृदांना भोजन देतात. याशिवया हरिमान सप्ताह, भंडारा, मंदिराच्या सभागृहासाठी आर्थिक मदत हे त्यांचे धार्मिक काम अद्यापही सुरू आहे.
खैरे यांच्याकडे धार्मिक मदतीसाठी कोणी गेला आणि तो रित्या हाताने परतला असे कधीच होत नाही. खासदार असताना दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा बंगला म्हणजे अन्नछत्र आणि आश्रयस्थानच बनले होते. हजारो विद्यार्थी आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या प्रत्येकाला दिल्लीत खैरे यांचे निवासस्थान म्हणजे हक्काचे होते. बाहेरच्या राज्यात संकटात सापडलेल्या कुटुंबांना आर्थिक, वैद्यकीय किंवा इतर कुठलीही मदत करण्यात खैरे कायम तत्पर असतात.
चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने पाचव्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली होती. शिवसेना, एमआयएम-वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. मतविभाजन झाल्यामुळे खैरे यांचा केवळ पाच हजार मतांनी पराभव झाला. एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले. .
खैरे यांचा विजय पक्का समजला जात असताना शिवसेनेचेच कन्नडचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत लोकसभा निवडणूक लढवली. मराठा आरक्षणाचा मुद्दा तेव्हा तापलेला होता. जाधव हे मराठा असल्यामुळे त्यांना या वातावरणाचा फायदा झाला. शिवसेनेतील खैरे यांचे अंतर्गत विरोधक आणि युती असली तरी भाजपमधील खैरेंच्या विरोधकांनी जाधव यांना रसद पुरवली. त्यामुळे जाधव यांनी अनपेक्षितपणे 2 लाख 83 हजार मते मिळवली. त्यामुळे खैरे यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला.
खैरे या पराभवाच्या गर्तेतून लगेच बाहेर पडले. लोकांच्या भेटीगाठी, जनसंपर्क, धार्मिक, सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला. ग्रामीण व शहरी भागातून खैरे यांच्या संपर्क कार्यालयांत समस्या, कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या तसूभरही कमी झाली नाही. मंत्री, खासदार असताना खैरे यांचा जसा दिनक्रम होता, तो त्यांनी पराभवानंतरही कायम ठेवला. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार व त्याच्या कुटुंबाची इत्थंभूत माहिती संपर्क क्रमांक, पत्त्यासह खैरे यांच्याकडे आहे.
विवाह, मौज, वाढदिवस किंवा कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी या प्रत्येकाला शुभेच्छा पत्र पाठवण्याची व्यवस्था खैरे यांच्या संपर्क कार्यालायतून केली जाते. पराभव झाल्यानंतरही ती कायम आहे. एखाद्या मतदाराच्या घरी दुःखद घटना घडली तर प्रत्यक्ष भेट आणि ती शक्य झाली नाही तर शोक संदेशाचे पत्र या माध्यमातून खैरे प्रत्येकाच्या संपर्कात आहेत. दिवाळी, दसरा व इतर धार्मिक सणांच्यावेळी खैरे यांच्याकडून शुभेच्छा कार्ड पाठवले जातात. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर उपचार व वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी खैरे यांनी खास एका व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे.
बदलत्या काळानुसार खैरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. पक्षाची ध्येय धोरण, नेत्यांची भाषण, मेळावे याची माहिती खैरे आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून देत असतात. याशिवाय जिल्ह्यातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबूक पेज आणि आता X हॅंडलवर पोस्ट केल्या जातात.
चंद्रकांत खैरे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात मोठे वाद, चुकीची विधाने असे प्रसंग क्वचितच ऐकायला मिळतात. महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करत असतांना त्यांचे आपल्या सहकाऱ्यांशी अनेकदा वाद झाले पण ते टोकाचे नसायचे. किवा ते फारसे समोर आले नाहीत. दिवाकर रावते, रामदास कदम या नेत्यांशी प्रामुख्याने खैरे यांचे खटके उडाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खैरे यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना जेव्हा पक्षाने संधी दिली. तेव्हा खैरे यांनी आदित्य ठाकरे यांना माझ्याऐवजी प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
पक्षनिष्ठा हा खैरे यांचा सर्वात मोठा सकारात्मक मुद्दा म्हणावा लागेल. प्रत्येकाच्या सुःखात, दु:खात मदतीला धावून जाणे. तन-मन-धनाने त्याला मदत करणे या खैरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे राज्याच्या, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात अडचण आली तर पहिल्यांदा खैरे यांचे नाव मदतीसाठी घेतले जाते. थोरा-मोठ्याबद्दल आदरभाव, पाया पडणे यामुळे खैरेंचे अनेक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक विषयात खैरे आर्थिक मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. शिवसेनेशिवाय इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांशी खैरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खैरे यांच्या कामाचे जाहीरपणे कौतुक केले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद, त्यानंतर झालेले सत्तांतर या सगळ्या घडामोडीत खैरे यांनी पक्षाची बाजू नेटाने लावून धरली. ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी संकटाच्या काळातही खंबीरपणे उभे राहिले. गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर साडेचार वर्षे लोटली, परंतु या काळातही खैरे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला. या जोरावरच खैरे यांची स्वतःची तीन ते साडेतीन लाख मते पक्की समजली जातात.
राजकारणात खैरे हे कच्च्या कानाचे म्हणून ओळखले जातात. एखाद्याने काही सांगितले की त्यावर पटकन विश्वास ठेवून समोरच्याला दुखावण्याचे प्रकार त्यांच्या बाबतीत अनेकदा घडल्याचे बोलले जाते. विशेषत: राज्यात मंत्री आणि दिल्लीत खासदार असताना असे प्रकार घडायचे. सर्वसामान्यांची कामे करतांनाही त्यांच्याकडून अनेकजण दुखावले गेल्याची उदाहरणे आहेत. खैरेंनी पक्षात आपल्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये, असा सातत्याने प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो.
दिल्लीपासून स्थानिक पातळीवरील निर्णयात खैरेंचा कायम हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे पक्षातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी दुखावले गेले. जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणात खैरे आणि दानवे असे दोन गट आहेत. या गटबाजीचा फटकाही शिवसेनेला अनेकदा बसला आहे.
ठाकरे गटाकडे सध्या तरी खैरे यांच्याइतका तुल्यबळ उमेदवार दुसरा कुणी नाही. खैरे यांना डावलून दुसरा उमेदवार दिला तर खैरेच त्याचा करेक्ट कार्यक्रम करतील, अशीही शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.