

Shivsena UBT News : महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी कमालीची घसरली. शंभर जागा लढवणाऱ्या या पक्षाला फक्त सहा जागा मिळाल्या. अंबादास दानवे हे स्वतःच्या भावालाही निवडून आणू शकले नाहीत. तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागातून विजयी झाले. परंतू पक्षाला मोठ्या प्रमाणात आलेल्या अपयशाचे खापर खैरे यांनी अंबादास दानवे यांच्या माथी फोडले. अंबादास दानवे यांचा विषय संपला आहे, जिल्हा परिषदेची सगळी सूत्रं मी हाती घेणार, असे खैरे यांनी सांगून टाकले.
खैरे यांच्या भूमिकेवर व्यक्त होताना अंबादास दानवे यांनी गुगली टाकली, 'माझा विषय संपला असेल, तर मी खैरे यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे' असं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका-नगरपंचायत एवढचं नाही तर महापालिकेच्या निवडणुकाही खैरे यांच्याच नेतृत्वात झाल्या. पण ते जर असं म्हणत असतील की जिल्हा परिषदेची जबाबदारी किंवा नेतृत्व ते करणार आहेत, तर माझी काहीही हरकत नाही. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आलेल्या अपयशाला अंतर्गत गटबाजी आणि खैरे-दानवे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जाते. खैरे यांनी अंबादास दानवे यांनीच पूर्णपणे महापालिकेची प्रचार यंत्रणा, उमेदवारांची निवड या संदर्भातले निर्णय घेतले. आम्हाला विचारले नाही, त्याच्यामुळेच आमच्या पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले, असा जाहीर आरोप केला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सगळी सूत्रं आपण आपल्या हाती घेणार आहोत, असेही खैरे यांनी सांगून टाकले होते. त्याला आज अंबादास दानवे यांनी प्रत्त्युतर दिले.
महापालिकेत आमच्या पक्षाला सहा जागा मिळाल्या. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात पैसा, सत्ता, प्रशासनाची ताकद वापरूनही त्यांना फक्त 13 जागा मिळाल्या. तरी ते जर म्हणत असतील की उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला तर ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत, असा टोला अंबादास दानवे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना लगावला. आमचे 26 उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. आम्ही ताकदीने निवडणूक लढलो. सत्ताधारी पक्षाच्या फोडाफोडीचे राजकारण, वारेमाप पैशाची उधळपट्टी, सत्तेचा गैरवापर याला तोंड देत आम्ही सहा उमेदवार निवडून आणले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही आम्ही तेवढ्याच ताकदीने उतरणार आहोत.
पैठणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ता गोर्डे यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावर दत्ता गोर्डे यांना आम्ही पैठणमधून विधानसभेची उमेदवारी दिली, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तरी ते पक्ष सोडून जात असतील तर पक्षाने त्यांना अजून काय द्यायला हवे होते? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेत आमचे नगरसेवक निवडून आले की ते शिवसेना भवन, मातोश्रीवर जातात, पण एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये जातात, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.