
जालना : छगन भुजबळला मंत्रीपद मिळालं नाही, त्याच्याशी माझा काय संबंध? मी खूप छोटा माणूस आहे, माझे हात वरपर्यंत पोहचत नाही. मला त्याचे नावही घ्यायचे नाही अन् बोलायचेही नाही. भुजबळ त्याच्या कर्माची फळं भोगतोय. त्यानेच मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावली, मराठा आरक्षणाचा मारेकरी तोच आहे, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर तोफ डागली.
भुजबळची खरी पोटदुखी त्याला मंत्रीपद न मिळाल्याची नाही, तर इतर ओबीसींना मंत्रीपद मिळाले त्याची आहे. याने काय ओबीसींच्या घरासमोर रेल्वेचे रूळ आंथरले होते का? की लोकांच्या घरावर सोन्याचे कौल चढवले होते? आता जे मंत्री झाले ते ओबीसी समाजाच्या विकासासाठी काम करणार नाहीत का? पण याला एकट्याला खायचे म्हणून आता तो पक्षाच्या अध्यक्षाविरोधात बोलत आहे.
त्याला मंत्रीपद दिल तेव्हा पक्षाचा अध्यक्ष चांगला होता का? असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अन् शपथविधी नुकताच पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांना डावलल्यानंतर त्यांनी पक्षाचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आगपाखड केली आहे. 'ओबीसींसाठी लढलो त्याचे मला गिफ्ट मिळाले', अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत भुजबळ आक्रमक झाले आहेत.
या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला तेव्हा, त्यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत ते पक्षमोडे असल्याचा आरोप केला. राज्यात कधीही मराठा-ओबीसी-धनगरांचे भांडण नव्हते, पण भुजबळने स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी या समाजात भांडण लावले. त्याला मंत्रीपद मिळालं नाही ते त्याच्या कर्माचे फळ आहे. मराठा आरक्षणाचा मारेकरी तोच आहे, आताही तो नव्या सरकारच्या विरोधात ओबीसींना रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावील, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
भुजबळ हा पक्ष फोड्या आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्याला मोठं केलं, त्यांची शिवसेना त्यानेच फोडली. शरद पवारांची राष्ट्रवादीही भुजबळनेच फोडली आता ही राष्ट्रवादी त्याला फोडायची आहे, असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. हा आता फडणवीसांचा ही कार्यक्रम लावील, पण त्याने आता गप्प राहावे, नाहीतर त्याला पुन्हा ईडी, सीबीआय अन् जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
भुजबळला दुसरा कोणी ओबीसीचा नेता, मंत्री झालेला बघवत नाही. ओबीसींचे गरीब लेकरं मंत्री झाले तर याच्या पोटात दुखू लागले आहे. ओबीसीचे सतरा मंत्री या समाजाचे भलं करणार नाही का? भुजबळाने मंत्री असताना असे काय दिवे लावलेत? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.