

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या प्रचार कार्यालयात प्रचंड राडा झाला. कामाला लागा, तुमची उमेदवारी फिक्स असल्याचा शब्द दिल्यानंतर आज शेवटच्या दिवशी उमेदवारी कापली गेल्याचे लक्षात येताच भाजप इच्छुकांच्या संयमाचा उद्रेक झाला. युती तुटल्याचे खापर शिवसेनेच्या नेत्यांवर फोडण्यासाठी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड हे प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेत होते.
याचवेळी दुसरीकडे बाहेर उमेदवारी डावलल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्या मराठे, सुवर्णा बदाडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांच्या नावाने शिमगा सुरू केला होता. एका इच्छुकाने मी पक्षासाठी नोकरी सोडली, रात्रंदिवस काम केले, मग मला का डावलण्यात आले? याचे उत्तर द्या, असा जाब विचारत मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड बसलेले असलेल्या व्हिआयपी कक्षाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीसांनी व इतर कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला यात झालेल्या झटापटीत व्हीआयपी कक्षाचे गेट लाथ मारून तोडण्यात आले.
तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक आणि तयारी केलेल्या दिव्या मराठे या महिलेने तीस वर्षापासून आपण पक्षात काम करत आहोत, असे असताना मंत्र्यांच्या जवळल्या एका छोट्या व्यक्तीला तिकीट देण्यात आल्याचा आरोप केला. मला तयारी करायला सांगून ऐनवेळी तिकीट का नाकारले? माझ्यावर अन्याय का केला? असा सवाल मराठे यांनी उपस्थित केला. प्रचार कार्यालयात हा गोंधळ सुरू असताना एका उमेदवारी डावलेल्या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि पोलीस, कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडाला. पोलीसांनी पेट्रोलची बाटली हिसकावून घेत त्या कार्यकर्त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
इकडे सुवर्णा राम बेदाडे या इच्छुक महिलेने प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप केला. आक्रमक होत या महिलेने मंत्री सावे, कराड बसलेल्या दालनात जाब विचारण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीसांनी तिला रोखले, भाजपच्या दुसऱ्या महिला पदाधिकारी व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लता दलाल यांनी या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेदाडे या महिलेला भोवळ आली, त्यांना पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न महिला पोलीस कर्मचारीही करत होत्या. पण त्यांनी मी इथून हटणार नाही, आत्मदहन करेन, असे म्हणत ठिय्या दिला.
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लता दलाल यांनी ही तिकीट वाटपात मोठा घोळ झाल्याचा आरोप करत नेत्यांवर संताप व्यक्त केला. ओबीसी महिला वार्ड आरक्षित असताना तिथून ओपन महिलेला उमेदवारी कशासाठी दिली? जिथे ओपन वार्ड आहे, तिथे ओबीसी महिलांना उमेदवारी असे प्रकार झाले आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे. त्यामुळे आपण अपक्ष भरलेला अर्ज कुठल्याही परिस्थिती मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भोवळ आलेल्या महिलेला धीर देताना तुम्ही अर्ज भरा आणि माघार घेऊ नका, आपण यांना पाडू, असे दलाल म्हणत होत्या. ज्या भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती, त्यालाच उमेदवारी देण्यात आली, असा आरोपही या महिलांनी केला. एकूणच तास-दोन तास भाजप प्रचार कार्यालयात हा गोंधळ सुरू होता. पोलीसांनी गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काहींनी आत्मदहनाचा इशारा देत सोबत आणलेल्या राॅकेल, पेट्रोलच्या बाटल्या पोलीसांनी जप्त केल्या.
भारतीय जनता पक्षात मी गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो, पण आताचा भाजप पक्ष पूर्णपणे बदलला आहे. तो पैशावाल्यांचा झाला असल्याचा आरोप उमेदवारी नाकारलेल्या एका कार्यकर्त्याने केले. इतर पक्षातून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाल्यामुळेच आमच्या सारख्या निष्ठावंतावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करतानाच असे यापुर्वी भाजपमध्ये कधीही होत नव्हते, अशा शब्दात संबधित कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.