

Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक होऊन शंभर दिवस उलटून गेले आहेत. महापालिकेवर शतप्रतिशत भाजपची सत्ता आली आहे. महापौर, स्थायी समिती सभापती ही महत्वाची पदं याच पक्षाकडे आहेत. मित्रपक्ष शिवसेनेची उपमहापौर पदावर बोळवण करण्यात आली आहे. बहुमतासह सत्ता हाती आली असली तरी शहरवासियांच्या विकास कामांना पाहिजे तशी गती अद्याप आलेली नाही, असा सूर विरोधक आणि नागरीकांकडूनही निघतोय.
अशातच सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जनतेच्या पाणी, वीज, रस्ते, कचरा, उद्याने, शाळा, शिक्षण या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी शहरातील रस्ते, चौक आणि गल्ल्यांचे नामकरण करण्यातच व्यस्त आहेत. महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या तीन सर्वसाधारण सभांमध्ये हाच नामकरणांचा कित्ता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी गिरवला होता. आता 14 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधरण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतही शहरातील डझनभराहून अधिक रस्ते, चौकांच्या नामकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 14 रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची कार्यक्रम पत्रिका आणि त्या सत्ताधारी पक्षाच्या 36 नगरसेवकांकडून देण्यात आलेल्या रस्ते, चौकांच्या नामकरणांच्या प्रस्तावाची यादीच आपल्या सोशल मिडिया पेजवर टाकून संताप व्यक्त केला आहे. शहरवासियांनी यासाठी आपल्याला नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवले का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला आहे.
जणू काही शहराच्या सर्व समस्या सुटल्या आहेत आणि 14 जुलै रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या सर्वसाधारण सभेत चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही, अशा अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वावरत आहेत.
ते रस्ते, स्वच्छता, स्वच्छ आणि वेळेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उत्तम वैद्यकीय सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणे, अधिक चांगली उद्याने आणि मोकळ्या जागा, रमाई घरकुलमधील भ्रष्टाचार, पूर्वी घाणेरडे काम करणाऱ्या त्याच कंत्राटदाराला कचऱ्याचे कंत्राट देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून होणारे प्रयत्न आणि दबाव इत्यादी विषयांवर बोलतील, असा विचार करून मतदारांनी आपल्या नगरसेवकांना निवडून दिले होते.
पण त्याऐवजी नगरसेवकांनी काही महान व्यक्तींच्या नावावर रस्ते, गल्ल्या आणि मोहल्ल्यांची नावे बदलण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. यात शंका नाही की ते महान होते, पण नगरसेवकांना विशेषतः सत्ताधारी वर्गातील लोकांना वाटते की, त्यांच्या घाणेरड्या रस्त्यांची आणि गल्ल्यांची नावे बदलून किंवा त्यांचे स्मारक आणि पुतळे उभारून ते त्या महान व्यक्तींना अधिक महान बनवतील. खाली त्या विद्वान 36 नगरसेवकांनी सादर केलेल्या नामांतर प्रस्तावांची यादी आहे. देवा माझ्या शहराचे रक्षण कर, जय हो.. असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
असे आहेत नामकरण प्रस्ताव
- देशभक्त चापेकर बंधू चौक
- तुकामाई चौक
- धर्मवीर आनंद दिघे मार्ग
- राजे यशवंतराव होळकर चौक
- महात्मा बसवेश्वर नगर
- शहीद भगतसिंग चौक
- संजयसिंग नाईक चव्हाण चौक
- संत सेवालाल महाराज चौक
असे आहेत नामकरण प्रस्ताव
- सिद्धिविनायक उद्यान
- धर्मवीर मोरेश्वर सावेजी मार्ग
- छत्रपती राजेश्री शाहू महाराज प्रवेशद्वार
- श्री खाटू श्याम बाबा प्रवेशद्वार
- राजमाता जिजाऊ माँ साहेब प्रवेशद्वार
- धर्मवीर संभाजी महाराज प्रवेशद्वार
- शंकरराव पाटील औताडे प्रवेशद्वार
- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वार
- हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराज प्रवेशद्वार
- राष्ट्रसंत गाडगे बाबांचा पुतळा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.