

Marathwada Political News : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत अनेकांनी आपले नशीब आजमावले. तर आज राजकारणात भक्कमपणे पाय रोवून उभे असलेल्या काही नेत्यांना पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवता आला तो याच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार किशनचंद तनवाणी, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दिग्गजांनी या मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवलेला आहे.
औरंगाबाद-जालना (आताचे छत्रपती संभाजीनगर-जालना) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा मराठवाड्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा आणि वजनदार मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातच थेट लढती पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या आणि मुख्य लढत दिलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये वरील नेत्यांची नावे समोर येतात.
2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या अंबादास दानवे यांनी एकहाती विजय मिळवला होता. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे दानवे तब्बल 524 मते मिळवून विजय झाले होते. काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांना त्यांनी पराभव केला होता. त्यांना केवळ 106 मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची अनेक मते फुटली.
त्याआधी 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसने युतीच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. काँग्रेसच्या सुभाष झांबड यांनी मोठी आर्थिक ताकद लावत 260 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणी यांचा पराभव केला. तनवाणी यांना 188 मते मिळाली होती. युतीचे संख्याबळ जास्त असूनही तनवाणी यांचा पराभव झाल्याने या निकालाची राज्यभरात चर्चा झाली होती.
शिवसेनेकडून किशनचंद तनवाणी यांनी 2007 आणि 2013 अशी दोनवेळा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2007 च्या निवडणुकीत किशनचंद तनवाणी हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात होते. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि ते पहिल्यांदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यांचा हा कार्यकाळ 2013 पर्यंत होता.
शिवसेनेने तनवाणी यांना 2013 मध्ये दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. शिवसेना-भाजप युतीचे पारडे प्रचंड जड होते. परंतु, पडद्यामागील तडजोडी आणि काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या तगड्या रणनीतीमुळे युतीची मते फुटली. या अत्यंत चुरशीच्या लढतीत झांबड यांना 260 मते मिळाली, तर तनवाणी यांना 188 मतांवर समाधान मानावे लागले होते.
शिवसेनेचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी 1999-2000 च्या दरम्यान या मतदारसंघातून नशीब आजमावले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत विजय मिळवला होता आणि ते विधानपरिषदेवर गेले होते.
2018 मध्ये झालेल्या निवडणुकीतही अब्दुल सत्तार किंगमेकरच्या भूमिकेत होते. त्यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना उघड पाठिंबा दिला. सत्तार यांच्याकडे असलेल्या स्थानिक मतदारांच्या एक गठ्ठा मतांमुळे अंबादास दानवे यांचा विजय सोपा झाला होता. या निमित्ताने एक योगायोग म्हणजे 2013 मध्ये ज्या किशनचंद तनवाणी यांचा शिवसेनेकडून लढताना पराभव झाला होता, त्यांनी पुढे भाजपमध्ये आणि नंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. तर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रेवश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.