

Dharashiv News: राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप,मेळावे,रोड शो, प्रचार सभा यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच उमेदवारीसाठी पत्ता कट झाल्यानं इच्छुकांनी अभी नही तो कभी नही, तिकीटासाठी कायपण असं म्हणत राजीनामा सत्र,पक्षांतर यांना मोठं उधाण आलं आहे. अशातच,आता शिवसेनेच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.
एकीकडे राज्यातील महापालिका निवडणुकांची मतदानाची तारीख जवळ येत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा किंवा तालुका पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान,माजी आरोग्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुढच्या काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.याचदरम्यान,आपल्या वादग्रस्त विधानं आणि रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत राहणारे भूम-परंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी संकल्प मेळाव्यातून थेट निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
तानाजी सावंत म्हणाले,विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकांवेळी शिवजल क्रांती आणि आणखी छोटीमोठी कामं असतील,तेव्हा तुम्ही मला 33 हजार मतांनी निवडून दिलं. पण नंतर पुन्हा एकदा प्रचंड काम केलं, महाराष्ट्राच्या निर्मित्तीपासून या मतदारसंघातून जो काही निधी आला, तो आणि मी आणलेला आत्तापर्यंतचा निधी एकत्र करा,त्याच्यापेक्षा एक रुपयाही जास्त नसेल तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार असल्याचं सावंत यांनी म्हटलं
विधानसभा निवडणुकीत केवळ हजाराच्या फरकाने विजयी झाल्याबद्दल त्यांनी मतदारांपुढे खंत बोलून दाखवली. तसेच,मंत्रिपदाबाबत मला देणं घेणं नाही, कारण मंत्रिपद हे जनतेच्या ह्रदयात असलं पाहिजे, त्यावर राज्य करणारं असलं पाहिजे. ते मंत्रिपद माझ्यादृष्टीने महत्वाचं नाही, ही माझी खंत आहे, असं रोखठोक मतही सावंत यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वीही तसे संकेत दिले आहेत. राज्यात 2022 मध्ये सत्तांतर घडवण्यासाठी 150 हून अधिक बैठका झाल्याचा दावा केल्यानंतर आता पुन्हा एकदा तानाजी सावंत राजकीय भूकंपाचे संकेत परंडा येथे दिले आहेत.
माजी मंत्री तानाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक शैलीत दिसून येत आहेत . आता आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषदा,नगरपंचायती या निवडणुकांसाठी दंड थोपटलं आहे. त्यांनी आगामी स्थानिकच्या निवडणुकीत सर्वधर्म समभाव, आपली एकी आणि आपला अजेंडा घेऊन जायचं. आपला अजेंडा कोणाला बदनाम करण्याचा नाही. आपला अजेंडा विकासाचा आहे असं स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंतांनी गेल्याच महिन्यात मोठा राजकीय बॉम्ब टाकला होता..ते म्हणाले, यांच्याकडे 234 आमदार आहेत म्हणतात… मग 2 असो किंवा 234 असो, अर्थ एकच आहे… माणसंच आहेत की! घाबरण्याचं काही कारण नसल्याचंही ठणकावलं. सावंतांच्या या खळबळजनक विधानानंतर परंडा व धाराशिव जिल्ह्यातील महायुतीत सारंकाही आलबेल सुरू नसल्याचीच चर्चा सुरू झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.