Chhatrapati Sambhajinagar: दादागिरी खपवून घेणार नाही! 36 नगरसेवकांच्या एमआयएमला शिवसेनेचा थेट इशारा; संभाजीनगर महापालिकेत गोंधळ

AIMIM corporators in Sambhajinagar civic meeting: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेकायदा प्लॉटिंगच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. या प्रकारानंतर शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएमला इशारा दिला.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on: 
Updated on: 

AIMIM : छत्रपती संभाजीनगर शहरातील बेकायदा प्लॉटिंग आणि कोट्यवधी रुपयांच्या जागेच्या कथित विक्रीवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घमासान झाले. एमआयएमचे स्वीकृत सदस्य मोहम्मद असरार यांनी प्रशासन आणि महापौरांवर गंभीर आरोप केल्याने त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नगरसेवकांनी त्यांना कडाडून विरोध केला. दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजी व रेटारेटीत सभागृहाचा पाऊण तास वाया गेला. अखेर एमआयएमने सभेवर बहिष्कार टाकल्यानंतर कामकाज सुरळीत पार पडले.

या गोंधळानंतर शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएमला इशारा दिला. तुमच्या पक्षाचे छत्तीस नगरसेवक आहेत, म्हणून सभागृहात दादागिरी खपवून घेणार नाही. बेकायदा प्लॉटिंगविरोधात सध्या सुरू असलेली कारवाई यापूर्वी कधीही झाली नव्हती. मात्र, जनतेचे प्रश्न सोडून भलतेच विषय मांडत सभागृहाचा वेळ वाया घालवला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवाय यांच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे प्रलंबित असून त्यावर निर्णय घेऊन विषय निकाली काढा, असे म्हणत जंजाळ यांनी यांनी नगरसेवक अपात्रता प्रकरणाची फाइल उघडण्याचा इशारा दिला.

सर्व साधारण सभेच्या सुरवातीला विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी जाधववाडी परिसरातील बालाजी मठाच्या व श्रीराम मंदिराच्या जागेचा (गट क्र. १२४, १२६) मुद्दा उपस्थित केला. वर्ग दोनची जमीन असतानाही येथे रस्ते व स्ट्रीट लाइट उभारून बेकायदा प्लॉटिंगची विक्री झाल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने एक रस्ता पाडला. मात्र, एका फोननंतर ही कारवाई थांबवण्यात आली. दीड महिना उलटूनही याप्रकरणी गुन्हे दाखल झाले नसून, तातडीने गुन्हे नोंदवण्याची मागणी बिल्डर यांनी केली.

नगरसेवक शिवाजी दांडगे यांनीही शहरातील अन्य भागांत सुरू असलेल्या बेकायदा प्लॉटिंगवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.याच वेळी स्वीकृत सदस्य मोहम्मद असरार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा विषय काढला. याप्रकरणी यापूर्वीच लेखी उत्तरे दिली असून, आयुक्तांकडे सुनावणी पूर्ण झाली असल्याने निर्णयाची वाट पाहावी, असे महापौरांनी सांगितले. यावर संतप्त झालेल्या असरार यांनी प्रशासन व महापौर जागा हडप करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन करूनही असरार यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्याने महापौरांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केले. निलंबनाच्या कारवाईनंतर एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. 'दादागिरी नही चलेगी'अशा घोषणा देत त्यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. याला भाजप नगरसेवकांनी 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी'अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही गटांत मोठी रेटारेटी झाली. निलंबित सदस्याला बाहेर काढण्याचे आदेश महापौरांनी सुरक्षा रक्षकांना दिले.

सभागृहात भाजप विरुद्ध एमआयएम असा तीव्र संघर्ष सुरू असताना सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, गटनेते किशोर नागरे आणि ऋषीकेश जैस्वाल यांचा अपवाद वगळता इतर नगरसेवक आपल्या जागेवरच बसून होते.सभेचे कामकाज शांततेत सुरू असताना एमआयएमचे नगरसेवक पुन्हा सभागृहात परतले. विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी पुन्हा मठाच्या जागेचा मुद्दा उपस्थित करत, मंत्री अतुल सावे यांनी यात लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता, असे वक्तव्य केले. या विधानावर महापौरांसह भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. याच गोंधळात महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत राष्ट्रगीत घेतले व सभा आटोपती घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.