

Chhatrapati Sambhajinagar MahaPalika Mayor : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात भाजपाने पहिल्यांदाच स्वबळावर बहुमताच्या आकड्याला हात घातला आहे. 115 नगरसेवकांची संख्या असलेल्या या महापालिकेत पहिल्यादांच प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली. भाजपने सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून आणत इतिहास घडवला. शतप्रतिशत सत्ता आणि भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.
शिवसेना-भाजपाने महापालिका निवडणुक स्वतंत्रपणे लढली. यात भाजपाला फायदा तर शिंदेंच्या शिवसेनेल फटका बसला होता. आता महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजपला बहुमतासाठी केवळ एका नगरसेवकाची गरज आहे. त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी रांगा लागल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 13 नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत म्हणायला युतीचा महापौर बसणार असला तरी सगळी सूत्रं ही भाजप आपल्या हातीच ठेवणार आहे.
महापौर शिवसेनेचाच होणार हा निवडणुकीपुर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत भाजपाने शिवसेनेला लहान भावाच्या भूमिकेत ढकलले आहे. 57 आणि 13 हा फरक पाहता महापालिकेत शिवसेनेला भाजपासोबत फरपटत जावे लागणार असे चित्र दिसते. महापौर पदासाठी युती झाली तर शिवसेनेच्या वाट्याला उपमहापौर पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाचे 57 नगसेवक निवडून आल्यानंतर महापौर पद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. भाजपकडून अनेक नगरसेवक हे तीन-चार टर्म निवडून आलेले आहेत. तसेच भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सभागृह सक्षमपणे चालवू शकेल असा अनुभवी चेहरा महापौर पदासाठी निवडला जाईल, असे स्पष्ट केले आहे. प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, महेश माळवदकर, समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, माधुरी अदवंत, अनिल मकरिये अशी डझनभर नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ यापैकी कोणाच्या गळ्यात पडते, की मग भाजपा धक्कातंत्राचा वापर करत नवे नाव समोर आणते हे लवकरच स्पष्ट होईल.
महापौर, उपमहापौरांची निवड येत्या 10 फेब्रुवारीला हात उंचावून केली जाणार आहे. या निवडीसाठी सकाळी 11 वाजता विशेष सभेत होणार आहे. उमेदवारी अर्जांचे वितरण 4 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर 6 फेब्रुवारी सायंकाळपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अर्ज छाननीनंतर उमेदवारांची नावे घोषित केली जातील आणि नगरसेवक हात उंचावून मतदान करतील.
मतांची नोंद कार्यवृत्तांतात केली जाणार असून समान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय होईल. सभागृहातील राजकीय समीकरणांमुळे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी अतिरिक्त पाठिंब्याची गरज असल्याने हालचालींना वेग आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.