

Chhatrapati Sambhajinagar News : नगरसेवक होऊन अवघा एक महिना झाला नाही तर नव्याने निवडून आलेले नगरसेवक मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना धमक्या द्यायला लागले. बॅनरप्रकरणी गुन्हा नोंदवायला गेले की कुणाकुणाचे फोन येतात यावर बोलायलाच नको. आता तर जीबी (सर्वसाधारण सभा) असल्याने थेट थांब आता तुला 'जीबी'मध्ये पाहतो म्हणून नगरसेवकांकडून धमकावले जात असल्याचे खुद्द मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटले.
पोलिसांच्यावतीने सोमवारी (ता.16) तापडिया नाट्य मंदिरात झालेल्या शिवजयंती समन्वय समितीच्या बैठकीत शहरातील बॅनरबाजीचा विषय निघाला. नव्या महापौरांनी शहरात अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर खपवून घेणार नाही असे सांगितले होते. पण, सध्या महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक संस्था आणि संघटनांच्या हजारो बॅनर, पोस्टर, होर्डिंगने शहर विद्रुप झाले. त्याच राजूरकरांच्या उपस्थितीत आजच्या बैठकीत बॅनरबाजीचा विषय निघाला तेव्हा आयुक्त श्रीकांत यांनी नव्या नगरसेवकांच्या आणि नेत्यांच्या दादागिरीचे वर्णन केले.
आयुक्त म्हणाले, "शहरातीतील बॅनरबाजीवर कारवाईसाठी महापालिका अधिकारी जाताच नेते समोर येतात. बॅनरप्रकरणी गुन्हा नोंदवायला गेले की कुणाकुणाचे फोन येतात यावर बोलायलाच नको. आता तर जीबी असल्याने थांब आता तुला जीबीमध्ये पाहतो म्हणून नगरसेवकांकडून थेट धमकावले जात आहे," असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी नगरसेवकांची नावे घेणे टाळले.
या वक्तव्यानंतर सभागृहात एकाने उठून 'साहेब जनतेच्या मतावर निवडून आल्यानंतर असे प्रकार होत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते कोण याबाबत माहिती समोर यायला हवी', अशी भूमिका घेतली. त्यावर 'कशाला वाद' म्हणत आयुक्तांनी वेळ मारून नेली.
महापौर राजूरकर यांनी शहरातील बॅनरबाजीबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील छत्रपती शिवरायांचे पुतळे असलेल्या परिसरात तर कार्यक्रमालाही जागा राहत नाही अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडून बोलताना आयुक्त श्रीकांत यांनी बॅनरबाज शहरभर विद्रुपीकरण करतात. खांब दिसेल तिथे बॅनर असे चित्र पाहायला मिळते. एकही खांब या बॅनरबाजांनी रिकामा ठेवला नाही असे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.