BJP-Shivsena News : भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या लाडक्या संभाजीनगरमधून दोन्ही शिवसेनेला 'उखाड दिया'!

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत दोन्ही शिवसेनांना पराभूत केले. मजबूत संघटन, नियोजन आणि रणनीतीमुळे भाजपने शतप्रतिशत सत्तेवर आपली पकड मजबूत केली.
BJP leaders and workers celebrate the historic municipal election victory in Chhatrapati Sambhajinagar after securing a clear majority and ending two-decade-long political dominance of Shiv Sena.
BJP leaders and workers celebrate the historic municipal election victory in Chhatrapati Sambhajinagar after securing a clear majority and ending two-decade-long political dominance of Shiv Sena.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर काल भगवा फडकला. पण या भगव्यात हिरवा रंग ही दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरातच 'ना खान ना बाण, राखू भगव्याची शान' असा नवा नारा दिला होता. भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी तो खराही करून दाखवला.

पण हे करत असताना संभाजीनगर महापालिकेत ज्या शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून वीस वर्ष सत्ता उपभोगली त्याच एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही शिवसेनेला उखाडण्याचे काम भाजपने केले, असा आरोप आता होऊ लागला आहे.

कोणाचे हिंदुत्व अधिक श्रेष्ठ किंवा कट्टर? असा वाद दोन्ही शिवसेनांमध्ये लावून दिल्यानंतर भाजपने महापालिकेवर शतप्रतिशत सत्तेचा टाकलेला डाव यशस्वी झाला. महापालिकेत युती होऊच नये या भाजपच्या प्रयत्नांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या चुकीच्या धोरणामुळे हातभार लावला. गेल्या पाच- दहा वर्षात भाजपचे संघटन शिवसेनेच्या प्रत्येक वार्डात आणि गल्लीबोळात खोलवर इतके रुजले की याचा थांगपत्ता त्यांच्या नेत्यांना लागलाच नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या खांद्यावर मंत्रिपदाची झूल आल्यावर त्यांच्या डोक्यात हवा शिरली. ती कालच्या निकालाने निघाली असेल अशी आशा आहे.

एकनाथ शिंदे यांनी युती संदर्भात सर्वाधिकार दिल्यानंतर स्थानिक पातळीवर शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या दबावाला बळी पडत शिरसाट यांनी एकूण सारासार पक्षाचा विचार न करता फक्त आपला मुलगा आणि मुलगी कसे सेफ राहतील? असेच धोरण ठेवले. शिवसेनेतील ही अंतर्गत गटबाजी आणि कुरबुर भाजपचे स्थानिक नेते चांगले ओळखून होते आणि मित्र संकटात सापडला याची जाणीव झाल्यानंतर भाजपने शेवटचा डाव टाकला.

युती करायचीच नव्हती, त्यामुळे ती तुटणार याचा अंदाज भाजपाला फार आधीपासून आलेला होता. त्यामुळे त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. युती तुटण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि अवघ्या दोन अडीच तासात भाजपने 90 हून अधिक उमेदवार मैदानात उतरवले. संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा ॲक्शन मोडवर ठेवल्यामुळे भाजपने एक हाती 57 उमेदवार निवडून आणत शतप्रतिशत सत्तेला गवसणीही घातली.

भाजपने कुबड्या झुगारल्या..

काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापुढे भाजपला कुबड्यांची गरज भासणार नाही, असे संकेत दिले होते. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यातून योग्य बोध घेत त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत कुबड्या झुगारण्याचा पहिला प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर महापालिका निवडणुकीला भाजप मोठ्या विश्वासाने सामोरे गेली. त्याचा परिणाम राज्यातील 29 पैकी 22 महापालिकांमध्ये शतप्रतिशत किंवा काही ठिकाणी युतीच्या माध्यमातून कमळ फुलवण्यात ते यशस्वी ठरले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादाच्या विचारांनी भारवलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचे बोट धरून पुढे आलेल्या भाजपने आज त्याच शिवसेनेची या संभाजीनगरातून पाळेमुळे उखडून टाकण्याचे काम केले आहे. अर्थात याला शिवसेना पक्षात पडलेली फुट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत वादही तितकेच कारणीभूत ठरले.

राज्यातील महायुतीमध्ये असलेल्या शिवसेनेने सत्तेचा वापर स्वतःसाठी अधिक आणि पक्ष संघटना वाढीसाठी कमी केला, हेच या कालच्या निकालावरून स्पष्ट होते. निष्ठावंतांना डावलून घराणेशाही पुढे रेटण्याच्या नादात पक्षाला आपण खड्ड्यात ढकलत आहोत हे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना कळलेच नाही. याउलट शिवसेनेसोबतची युती तोडत भाजपने पक्षांतर्गत बंडखोरी, नाराजी मोडून काढत एक हाती 57 उमेदवार निवडून आणले. हा खरा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या नेतृत्वातील फरक म्हणावा लागेल.

निवडणुका हलक्यात घेतल्या

भारतीय जनता पक्ष हा गल्ली असो की दिल्ली कुठलीही निवडणूक सहज घेत नाही. अगदी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री प्रचारासाठी फिरले. त्या तुलनेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे नेते आपापल्या जिल्ह्यातच अडकून पडले. हीच गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही झाली. मुंबई महापालिका राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य वाऱ्यावर सोडले. छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेली एक सभा आणि आदित्य ठाकरे यांनी काढलेली मशाल रॅली सोडली तर शिवसेनेचे राज्यातील इतर कुठलेच मोठे नेते संभाजीनगरकडे फिरकले नाहीत.

मुंबई नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त सभा घेतल्या तशी सभा संभाजीनगर मध्ये घेतली असती तर पक्षाच्या नगरसेवकांची संख्या किमान दोन आकडी तरी झाली असती अन् इभ्रतही वाचली असती. राज्याच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले आणि स्थानिक नेत्यांनी एकमेकांची जिरवण्यात आपली शक्ती खर्ची घातली. याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 99 पैकी फक्त सहा नगरसेवक निवडून येण्यात झाला.

दुसरीकडे राज्याच्या सत्तेत आणि जिल्ह्यातच मंत्रिपद असतानाही शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी कमालीची घसरली. याची जबाबदारी आता नक्की कोण घेणार? हा खरा प्रश्न आहे. जबाबदारी कोण स्वीकारणारी याही पेक्षा पक्षाचे जे नुकसान झाले ते पुढील काळात कसे भरून निघणार? हा खरा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर असणार आहे.

BJP leaders and workers celebrate the historic municipal election victory in Chhatrapati Sambhajinagar after securing a clear majority and ending two-decade-long political dominance of Shiv Sena.
Parbhani MahaPalika Result : बंडू बाॅस-राहुल पाटलांनी भांडणं मिटवली अन् परभणीचे मैदान मारले; भाजपला पाणी पाजून शिवसेना-काँग्रेस आघाडीला बहुमत!

शिरसाट यांच्या नुसत्याच वल्गना

पालकमंत्री संजय शिरसाट यांचा गेल्या वर्ष- दीड वर्षातील कारभार आणि संघटनात्मक पकड पाहिली तर त्यांनी विरोधकांवर टीका, आरोप- प्रत्यारोप करण्यातच अधिक धन्यता मानली असे दिसते. दिव्याखाली किती अंधार आहे? हे त्यांना पालकमंत्री असूनही समजलेच नाही. पक्षाचे प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर भूमिका मांडणे आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या नावाने रोज शिमगा करणे हीच आपली कामगिरी असल्याचा समज बहुदा शिरसाट यांनी करून घेतला.

BJP leaders and workers celebrate the historic municipal election victory in Chhatrapati Sambhajinagar after securing a clear majority and ending two-decade-long political dominance of Shiv Sena.
Chhatrapati Sambhajinagar Winning Candidates Full List : छत्रपती संभाजीनगरचा गड कुणी राखला अन् कुणी गमावला? दिग्गजांना धक्का की नवख्यांची बाजी? वाचा सविस्तर निकाल...

त्यामुळे भाजपने कधी आपला केसाने गळा कापला, हे त्यांना कळलेच नाही. मोठा भाऊ आम्हीच असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने 13 जागांवर रोखत छोटा भाऊ देखील होऊ दिले नाही. शिंदेंची शिवसेना थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. पंधरा दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेतील सुमार कामगिरीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेला काही अवधी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेचा रिकॅप जिल्हा परिषदेत दिसला नाही तरच नवल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com