
Assembly Session News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाची मुदत येत्या 29 आॅगस्ट रोजी संपत आहे. काल सभागृहात त्यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. या कौतुकाची राज्यभरात चर्चा झाली, त्याचे अनेक अर्थ काढले गेले. पण या कौतुक सोहळ्याला चोवीस तास उलटत नाही, तोच अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभाराचेच सभागृहात वाभाडे काढले.
राज्याचे गृहमंत्रीही असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरातच कायदा व सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत, हे दानवे यांनी आकडेवारीसह सभागृहात मांडले. खून, दरोडे, बलात्कार, अपहरणाच्या घटनांचा दाखला देत महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात दहाव्या क्रमांकावर असल्याचे दानवे यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आले आहे. या शिवाय सरकारच्या विविध खात्यात भ्रष्टाचारही बोकाळला आहे.
मंत्री कमिशन घेतल्या शिवाय कोणतंही काम करत नाहीत. राज्यात शेतकर्यांचे हाल सुरू आहेत, तर महिला भगिनींवर अन्याय आत्याच वाढले आहेत. यावर सरकारने मौन धारण केले असून फक्त कंत्राट मिळवण्यात त्यांना रस असल्याची टीका दानवे (Ambadas Danve) यांनी केली. सत्ताधारी पक्षातील लोकं अनेक गुन्ह्यात सहभागी असून महिला अत्याचारातही सत्ताधारी पुढे आहेत. राज्यात गुत्तेदार आणि दरोडेखोर यांचे राज्य आले असून कोणत्याच गुन्हेगारांवर कारवाई होत नसून कायदा पायदळी तुडवला जात आहे. राज्याचे गृह खाते करते तरी काय? असा सवालही दानवे यांनी केला.
पाच महिन्यात दीड लाखावर गुन्हे..
मागील पाच महिन्यात 1 लाख 60 हजार गुन्हे राज्यात घडले. 924 हत्या झाल्या असून दररोज सहा हत्या होत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले असून 3 हजार 506 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जवळचेच लोकं एवढी हिंमत कशी करतात ? मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात 10 हजार 400 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुणे संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र 10 क्रमांकावर आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रीय असून भाईगिरी सुरू असल्याचे दानवे म्हणाले.
पुण्यात सर्वांत जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून एका अधिकाऱ्याची 92 लाख रुपयांची फसवणूक झाली. सरकारने पोलीस भरतीचे फक्त आश्वासन दिले मात्र त्यावर अंमलबजावणी केली नसल्याचे दानवे म्हणाले. अल्पवयीन मुलं, महिला अत्याचार, घरगुती अत्याचार यांचे प्रमाण 4 हजार 336 इतके वाढले आहे. वैष्णवी हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाने हुंड्यासाठी छळ करून हत्या केली. सत्ताधारी मंडळी गुन्हे करतात हे अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत दानवे यांनी निशाणा साधला.
मस्साजोग घटनेतील फरार आरोपी, बीड जिल्ह्यातील 17 वर्षीय मुलीवर झालेला छळ, जिल्हा परिषद येथे 30 महिलांचा झालेला छळ, अमली पदार्थांचे खेड्यापाड्यात वाढत असलेले प्रमाण, ठाणे, मुंबई, पनवेल ते भिवंडी परिसरात परमिट रूमच्या माध्यमातून सुरू असलेले ड्रग्सचे धंदे यावरही दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. संभाजीनगर येथे कीर्तनकार महिलेची दगडाने हत्या करण्यात आली. पनवेल भागातील गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी असून शासन याकडे गांभीर्याने बघत नाही. राज्यात पोलिस संरक्षणाखाली अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत गृहविभागावर दानवे यांनी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.