Aurangabad West Assembly Constituency : विधानसभा निवडणुक दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सलग दुसरा पराभव पहावा लागला. चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले. या पराभवाच्या धक्क्यातून सावरून विधानसभेच्या तयारील लागावे तर अंतर्गत गटबाजी आणि बाहेरच्या पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन निष्ठावंतावर अन्यायची भावना पक्षात वाढू लागली आहे.
शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात लढण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. लोकसभेला पराभूत झालेले चंद्रकांत खैर (Chandrakant Khaire) पुन्हा पश्चिमधून लढण्यास इच्छूक आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या संजय शिरसाट यांना एकनिष्ठ शिवसैनिकच पराभूत करू शकतो, असे म्हणत त्यांनी दावाही केला. पण खैरेंना आता घरी बसवायचे असे ठरवलेल्या जिल्हाप्रमुख, आमदार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाजपच्या राजू शिंदे यांना पक्षात आणले.
खैरे नको म्हणून राजू शिंदे यांना पक्षात आणले पण त्यांच्या पक्ष प्रेवशाआधी केलेला गाजावाजा फारसा काही वाजला नाही. स्वतः शिंदे आणि काही बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला होता. शिंदे यांच्या प्रवेशाला चंद्रकांत खैरे यांचा विरोध होता तसा तो पश्चिममधून इच्छूक असलेल्या बाळासाहेब गायकवाड, नंदकुमार घोडेले व पश्चिममधील अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांचाही होता. पण अंबादास दानवे यांच्या निर्णयापुढे कोणाचे काही चालले नाही.
राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश म्हणजे पश्चिमधून उमेदवारी फिक्स असे चित्रही निर्माण केले गेले. पण शिंदे जसजसे पश्चिममध्ये सक्रीय झाले, तसा त्यांना पक्षांतर्गत विरोध वाढू लागला. यामुळे बेचैन झालेल्या राजू शिंदे यांनी मला पद, जबाबदारी द्या, नाहीतर मी चाललो, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जाते. (Ambadas Danve) यावर तातडीने त्यांना पश्चिम विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देत थोपवून ठेवण्यात आल्याची चर्चाही पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे.
पश्चिम विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा शिंदे हेच पश्चिममधून उमेदवार असतील असे चित्र निर्माण झाले. पण यावेळी ते निर्माण होऊ नये याची काळजी चंद्रकांत खैरे, पश्चिमधील इच्छूक बाळू गायकवाड यांनी घेतली. पद मिळाले म्हणजे उमेदवारी, असा त्याचा अर्थ होत नाही, असे खैरेंनी स्पष्ट केले. तर बाहेरून आलेल्यांना पद देऊन पक्षातील निष्ठांवतांवर अन्याय केला जाऊ नये, अशी अपेक्षा बाळू गायकवाड यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केली.
समोर तगडा उमेदवार असताना त्याच्याविरोधात एकमताने ठाकरे गटाने उमेदवार दिला पाहिजे. पण सध्या या पक्षात उमेदवारीवरून बरचे मतभेद असल्याचे समोर येत आहेत. येत्या काही दिवसात ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजू शिंदे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी खैरे गट सक्रीय झाला आहे. मला नाही तर इतर कोणाला द्या, पण शिंदे नको, असा मतप्रवाह पक्षात आहे. तर दुसरीकडे शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला आता थेट उमेदवारी देऊन शब्द खरा करून दाखवण्यासाठी अंबादास दानवे यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.