Parbhnai Municipal Corporation : जगातील सर्वाधिक सदस्य असणारा आमचा पक्ष आहे, असा दावा भाजपचे नेते मोठ्या अभिमानाने करतात. पण सध्या या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या पाहिली तर यात मुळ भाजपचे किती? असा प्रश्न निश्चितच पडतो. विरोधकही यावरून भाजपला टोले लगावतात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणुकीची सुत्रं भाजपने ज्या नेत्यांवर सोपवली आहेत, ती सगळी नेते मंडळी ही काँग्रेस किंवा इतर पक्षातून भाजपमध्ये आलेली आहेत.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या काँग्रेस पक्षासोबत भाजप (BJP) व त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष लढा दिला, तेच नेते आज पक्षांतर करून भाजपमध्ये नेते झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंतावर अन्याय होत असल्याची भावना वाढू लागली आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्याकडे भाजपची सगळी सूत्रे हाती गेली आहेत. तिथे अशोक चव्हाण यांचाच शब्द प्रमाण मानला जात आहे. त्यामुळे ज्यांनी चव्हाण यांच्याविरोधात राजकारण केले, त्या मुळ भाजपच्या नेत्यांना त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती परभणीमध्ये निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सुरेश वरपूडकर यांच्यावर सगळी जबाबदारी दिली आहे.
2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणूकीत सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. आता निवडणुक जिंकण्याचे तेच तंत्र आणि रणनिती वरपूडकर भाजपासाठी आखणार आहेत. भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर त्यांच्यावर महानगरपालिका निवडणूकीची धुरा सोपवण्यात आली आहे. परभणीत भाजपने यावेळी स्थानिक आमदाराला पालकमंत्री केल्याचे सांगत आपली पाठ थोपटवून घेतली. मेघना बोर्डीकर या राज्यात मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत.
तरीही महापालिका निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सुरेश वरपूडकर यांच्यावर सोपवत त्यांच्यावरच अधिक विश्वास दाखवल्याचे दिसून आले आहे. परंतु मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच सुरेश वरपुडकर यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. भाजपला मागील पालिका निवडणूकांमध्ये फार यश मिळाले नव्हते. वरपुडकरांच्या पक्ष प्रवेशानंतर आता थेट सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
शिवसेना युतीसाठी आग्रही
सुरुवातीला भाजपने पालिका निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली होती. परंतु स्थानिक परिस्थितीची चांगली जाण असल्यामुळे अपेक्षीत मतांचे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून वरपुडकर व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे हे शिवसेनेसोबतच्या युतीसाठी आग्रही असल्याचे बोलले जाते. अद्याप युतीची घोषणा झाली नसली तरी लवकरच ती होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.