Latur Congress Politics News : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला लातूर जिल्हा गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपमय झाला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा विजय मिळवत हॅट्रीकचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तर काँग्रेसमध्ये मात्र जानेवारी अखेरीस मराठवाडा विभागीय बैठकची बैठक होऊनची शांतता आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना या पक्षाच्या कार्यकत्यांना एकही कार्यक्रम देण्यात आलेला नाही. त्यामुळे कार्यकत्यामध्येही मरगळ आहे आणि निरुत्साहाचे वातावरण पहायला मिळते.सक्षम उमेदवाराच्या शोधात असलेल्या काँग्रेसची मदार यावेळीही आयात उमेदवारावरच असणार असल्याचं दिसत आहे.
अशा अवस्थेत काँग्रेस(Congress) पक्ष निवडणुकीला सामोरा जाऊन विजय मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकतो, असा प्रश्नही उपस्थितीत केला जात आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून लातूरमध्ये मराठवाडास्तरीय बैठक घेण्यात आली. राज्याचे प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेते येथे आले. या बैठकीत फक्त आढावा घेण्यात आला. पण त्यानंतर नेत्यांची जिल्ह्याकडे अशी काही पाठ फिरली की पुन्हा कोणी फिरकलेच नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विलास साखर कारखान्याच्या आवारात पुतळ्याच्या लोकार्पणासाठी हे नेते पुन्हा एकत्र आले. यात आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh) यांनी राज्याचे नेतृत्व करावे, असे सांगून ते गेले. पण त्यांचा सल्लाही अमित देशमुख यांनी फारसा मनावर घेतल्याचे दिसत नाही. काँग्रेसला मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. पण, कार्यकर्त्यांना अद्याप उमेदवार कोण असणार? याचीच कल्पना नसल्याने तेही उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
गेल्या निवडणुकीत पक्षाने उद्योजक मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघावर लादले होते. स्थानिकांत नाराजी होती, त्यामुळे निकाल काय लागयाचा तो लागला. यावेळीही काँग्रेसवर उमेदवार आयात करण्याचीच वेळ आली आहे. काँग्रेसला अजूनही उमेदवाराचा शोध घेता आलेला नाही. मुंबईच्या बैठकीत मोजक्या एक-दोन नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
यात माजी सनदी अधिकारी भाईदास ईश्वरदास ऊर्फ भा. ई. नगराळे हे दोन निवडणुकांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पण, पक्षाने त्यांच्या पदरात उमेदवारीचे दान टाकलेले नाही. मूळचे धुळ्याचे असलेले नगराळे यांनी उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने आठ महिन्यापूर्वी लातूरात आपला मुक्काम हलवून घरही केले आहे. सध्या ते एकटेच मतदारसंघात फिरतांना दिसतात. पक्षीय वर्तुळात दुसरे एखादे नावदेखील फारसे चर्चेत नाही. त्यामुळे लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची मदार आयात उमेदवारावरच असणार असे दिसते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.