Manoj Jarange On Lok Sabha Election 2024: खासदारांचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (26 एप्रिल) रोजी मतदान होत आहे, तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. अशातच या निवडणुकीत मराठा विरोधकांना पाडा, असं आवाहन मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना केलं आहे.
जालना जिल्ह्यातील (Jalna) अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तब्येत खालावल्यामुळे सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत. , तरीही त्यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केलं. मतदान केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी मनोज जरांगे म्हणाले, मी कुणालाही मतदान करा असं सांगितलं आहे, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरे, मराठा (Maratha) आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना समाजाने मदत करावी. जरी आपण उमेदवार दिला नसला, पाठिंबाही दिला नसला तरी पाडण्यातही आपला विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे, असा सूचक सल्ला त्यांनी या वेळी मराठा समाजाला दिला.
ते म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाजूने असेल त्यालाच करा. विरोधकाला इतक्या ताकदीने पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या नाही राहिल्या पाहिजेत. मराठ्यांची एकजूट दाखवा. तसेच राज्यात असे अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचं नाहीय, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे, असंही जरांगे या वेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीतदेखील मराठा आरक्षणासाठी राज्यांतल्या विविध भागांमध्ये दौरा करत आहेत. याचदरम्यान ते बीड (Beed) दौऱ्यावर असताना त्यांनी प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच आता त्यांनी थेट रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केलं आहे. त्यानंतर मराठा विरोधकांना पाडा, असं वक्तव्य केल्यामुळे जरांगेंचा रोख नेमका कोणाकडे आहे महाविकास आघाडी (MVA) की महायुती याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.