Phulambri Constituency : गेल्या चौदा वर्षापासून बंद पडलेल्या फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा वनवास अखेर संपणार आहे. येत्या विजयादशमीला कारखान्याचे बाॅयलर पेटणार असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती-महाविकास आघआडी या दोन्ही पक्षांनी देवगिरी साखर कारखान्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. अनुराधा चव्हाण यांनी हा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
फुलंब्री तालुक्याला गत वैभव प्राप्त करून देणाऱ्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अखेर पेटणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर देवगिरी कारखान्यातील चिमणीतून पुन्हा धुर निघताना दिसणार आहे. हा कारखाना कर्जमुक्त करून सर्व देणेदारांचे देणे देऊन प्रशासकीय मंडळाची कारखान्यावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांनी दिली.
फुलंब्री शहर परिसरात असणाऱ्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना 17 फेब्रुवारी 1989 मध्ये करण्यात आली होती. (BJP) देवगिरी कारखान्याच्या मालकीची मोठी मालमत्ता देखील होती. मात्र सदरील कारखाना राजकीय हस्तक्षेपामुळे कर्जाच्या खाईत बुडाला होता. त्यामुळे जमिनीतून मिळालेल्या 124 कोटी 65 लाखाच्या मोबदल्यातून देणेदाराची देणी दिली आहेत. त्यामुळे आता राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवून गळीत हंगाम सुरू करण्यात येणार आहे.
कारखान्यावर एका वर्षासाठी प्रशासकीय मंडळ
देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर कल्याण चव्हाण, नितीन देशमुख, योगेश मिसाळ या तिघांची अशासकीय सदस्य म्हणून प्रशासकीय मंडळात निवड करण्यात आली आहे. एका वर्षासाठी सदरील निवड साखर प्रादेशिक सहसंचालक एस.बी.रावल यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये देवगिरी सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करून सुरू करणार असल्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले होते. या अनुषंगाने राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना कर्जमुक्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत कारखान्याची पुनर्बांधणी करून तो सुरू करणार असल्याचे अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.
कारखान्याची सद्य स्थिती
समृद्धी महामार्गात कारखान्याची बरीच जमीन गेली. यातून भूसंपादनापोटी 27 कोटी 31 लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय चौका येथील जमीन विक्रीतून 07 कोटी 40 लाख एवढी रक्कम मिळाली. सावंगी येथील जमीन विक्रीतून कारखान्याला 84 कोटी दहा लाख व जमा रकमेवर पाच कोटी 84 लाख रुपये व्याज मिळाले आहे. सध्या कारखान्याकडे एकूण जमा रक्कम ही 124 कोटी 65 लाख इतकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
देणेदारांची देणी दिली..
देवगिरी साखर कारखान्याने याच रकमेतून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे 36 कोटी 55 लाख, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सुरक्षा रक्षक व इतरांचे 08 लाख, न्यायालयाच्या आदेशानूसार प्रोव्हिडट फंडांची देणी 05 कोटी 66 लाख, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार 05 कोटी 95 लाख, ग्रॅच्युईटी 03 कोटी 11 लाख तसेच झांबड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला 01 कोटी 70 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय आयएआरसी लीगल खर्च 11 लाख, बँक ऑफ बडोदा कर्ज 14 कोटी 80 लाख, समर्थ सहकारी साखर कारखाना ऊस तोडणी वाहतूक बिले 10 कोटी 20 लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत.
ज्ञानेश्वर कारखाना भेंडा ऊस बिले तोडणी व वाहतूक खर्चापोटीचे 08 कोटी 38 लाख, जितसम ट्रान्सपोर्ट कंपनी 01 कोटी 56 लाख, विज बिल देणे महावितरण 33 लाख तर डी.आर.टी. यांनी एकूण दिलेली देणी 88 कोटी 43 लाख एवढी आहेत. रिट पीटिशन अधीन राहून डी.आर.टी.कडे जमा 22 कोटी 83 लाख तर आज रोजीची शिल्लक रक्कम 13 कोटी 39 लाख असल्याचे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.