
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या आधी (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सव्वा दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये देणाऱ्या आणि त्यात वाढ करून 2100 रुपये देणार असे वचन सत्ताधारी महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. मात्र निवडणुका होऊन महिना उलटला तरी लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम तर सोडा परंतु आधी जाहीर केलेले पंधराशे रुपये देखील अद्याप मिळालेले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये लवकरच दिले जातील, असे जाहीर केले. मग 2100 रुपये देणार या निवडणुकीआधी दिलेल्या वचनाचे काय झाले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी केला. मला वाटतं हे सरकार लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कुणाला तरी न्यायालयात पाठवेल आणि या योजनेची अंमलबजावणी थांबेल, अशी भितीही अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष कमी संख्येने असतानाही आम्ही जनतेच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याचा, दावा दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल शंका उपस्थित केली. निवडणुकीच्या वेळी पंधराशे रुपयात वाढ करून 2100 रुपये देऊ, असे सांगणारे सरकार आता त्याबद्दल काहीच बोलत नाही. 2100 रुपये देणार असे सांगतात मग पुरवणी मागण्यांमध्ये त्याची तरतूद का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करत दानवे यांनी सरकारच्या हेतू बद्दल शंका उपस्थित केली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून कल्याण, नवी मुंबई, पनवेल मध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेतून हे दिसून आले आहे. दररोज राज्यात कुठेतरी खून, दरोडा अशा घटना घडत आहेत.एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन वर्षात 80 खून झाले, असे सांगत अंबादास दानवे यांनी कायदा व सुव्यवस्था राज्यात आहे कुठे? असा सवाल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे राज्यभरात दौरा करणार आहेत. याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता तो त्यांचा खाजगी विषय आहे, त्याबद्दल मला माहित नाही. पण छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला आहे, एवढे मात्र खरे असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या 21 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. या प्रकरणात क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच होऊ नये, असे प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या संदर्भात दानवे यांना विचारले असता, पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे. कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने विरोधी पक्ष नेताच होऊ दिला नव्हता. राज्याच्या विधानसभेतही सत्ताधाऱ्यांचा असाच प्रयत्न आहे. आम्ही संख्येने कमी असलो तरी विधानसभेत विरोधी पक्षनेता असावा, असे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.