

Dharashiv News : धाराशिव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. विधान परिषदेवर निवडून गेलेल्या भाजपचे नूतन आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पक्षातील दोन गटांतील वाद चव्हाट्यावर आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गट अशा दोन गटांमध्ये विभागणी झाल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला खासदार ओम राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पूर्णपणे डावलण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
धाराशिव भाजपमधील अंतर्गत मतभेद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असले तरी ते उघडपणे समोर आले नव्हते. मात्र, आठवडाभरापूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांना भेटू दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर या वादाने अधिक तीव्र स्वरूप धारण केले.
या दोन गटांतील संघर्षाची पहिली झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टद्वारे पक्षातील नेत्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. "मतभेद असू शकतात, मात्र ते पक्षाच्या योग्य व्यासपीठावर मांडावेत. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त आणि पक्षाची प्रतिमा जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे," असे आवाहन त्यांनी केले होते.
मात्र, रविवारी झालेल्या बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याने हा वाद आणखी उफाळून आला. भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका आणि अधिकृत बॅनरवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नावच नव्हते. त्यामुळे पक्षातील नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमात खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राणाजगजितसिंह पाटील यांची अनुपस्थिती आणि राजेनिंबाळकरांची प्रमुख उपस्थिती याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यंकटराव गुंड यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर थेट आरोप केले. "जनसंघाच्या काळापासून भाजपशी निष्ठा ठेवणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची राणा पाटील यांना अॅलर्जी झाली आहे. ते जुन्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टाळतात, त्यामुळे आम्हीही त्यांना टाळत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीतही हेतुपुरस्सर उमेदवारी नाकारण्यात आली," असा आरोप त्यांनी केला.
गुंड यांनी पक्षातील सर्व घडामोडी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही सांगितले. "आम्ही अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठेने काम करत आहोत आणि भाजपमध्येच राहणार आहोत. मात्र, आमच्या मनातील नाराजी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव भाजपमधील हा संघर्ष आता केवळ अंतर्गत नाराजीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो सार्वजनिक व्यासपीठावर पोहोचला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.