Marathwada Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांना शिंदे गटात घेण्यासाठी 'मिशन टायगर'ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडील जेवणावळी आणि त्यातील सहभागामुळे मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याभोवती सशंयाचे जाळे विणले गेले होते.
यावर (Sanjay Jadhav) जाधव-आष्टीकर या दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतरही ही चर्चा काही केल्या थांबत नव्हती. आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात शिंदे गटाच्या नेते, खासदाराच्या निमंत्रणावरून जेवायला जाण्याआधी पक्षाच्या प्रमुखांची परवानगी घ्या, असे आदेश दिल्यानंतर यावर विरोधकांनी टीका केली होती. गेल्या दोन दिवसापासून मात्र ठाकरेंच्या खासदारांसाठीच्या 'मिशन टायगर'ची चर्चा काहीसी शांत झाली आहे.
शिंदे गटाने कोकणात मोठ्या प्रमाणात (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला. आता पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी एकनाथ शिंदे व पक्षाच्या इतर नेत्यांनी फिल्डींग लावली आहे. जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असणार आहे. जाधव यांची मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर शिंदे गटाचे नेते जाधव यांचा प्रवेश लवकर करून घेण्यासाठी उत्सूक आहेत.
कोकणातील मिशनमध्ये एकनाथ शिंदे व इतर मंत्री गुंतले असल्याने उद्धव ठाकरेंच्या खासदारांसाठीच्या मिशनला काहीसा ब्रेक लागला आहे. खासदार संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनला हजेरी लावल्यानंतर त्याचे पडसाद परभणी, हिंगोलीत उमटले होते. संजय जाधव कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही, असा विश्वास परभणीकरांनी व्यक्त केला होता.
तर हिंगोलीकरांनी आष्टीकरांना लोकसभेत पाठवले आहे, महायुतीच्या विरोधात त्यांना निवडून दिल्यामुळे ते मतदारांच्या मताचा मान राखतील, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एकूणच या दोन्ही खासदारांबद्दल तयार झालेले संशयाचे जाळे तूर्तास दूर झाले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन टायगर अजून संपलेले नाही. त्यामुळे पुढील काळात शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांच्या निष्ठेची परीक्षा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.