Dharashiv News : धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्याठिकाणी ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुसरीकडे मात्र धाराशिव मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. खासदार ओम राजेनिंबाळकरांना यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे चुलत बंधू व धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर हे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसते. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
मकरंद राजेनिंबाळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला हा संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी खासदार राजेनिंबाळकर काय उपाय योजना शोधतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी 3 लाख 30 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण होते. मात्र, धाराशिवसोबतच परंडा, तुळजापूर या मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
धाराशिव मतदारसंघात खासदार ओम राजेनिंबाळकर यांची ओळख उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार अशीच आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत ते सिद्धही केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना घरातूनच धक्का बसला आहे. त्यांचे चुलत बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
चार महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. मोठ्या मताधिक्क्याने राजेनिंबाळकर विजयी झाले.
धाराशिव शहरात खासदार राजेनिंबाळकर यांना 16 हजाराहून अधिक मतांची आघाडी लाभली. यात माजी नगराध्यक्ष तथा खासदार राजेनिंबाळकर यांचे चुलत बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांचेही योगदान मोठे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मकरंद राजेनिंबाळकर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते.
ऐनवेळी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तथा ठाकरे सेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख असलेले कैलास पाटील यांच्या गळ्यात ओम राजेनिंबाळकर यांच्या पुढाकारामुळे उमेदवारीची माळ पडली. त्याच वेळी मकरंद राजेनिंबाळकर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मात्र माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी त्यावेळी माघार घेतली. आणि कैलास पाटील पहिल्यांदा विधानसभा सदस्य म्हणून कळंब-उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले होते.
त्यानंतर अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी गुजरातच्या सीमेवरून परतुन आलेल्या कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा सगळीकडे सुरू झाली. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सॊबत राहिले. तयामुळे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेचे शिलेदार म्हणून कैलास पाटील हेच उमेदवार असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते.
दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे सेनेला मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले होते. तुळजापूरमधून भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आव्हान देण्यासाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडेच राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवू इच्छित असलेल्या मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासमोर अन्य कोणताही मार्ग उरला नाही. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण हातात घेतले असल्याची चर्चा आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज विकत घेतला असून ठाकरे सेनेच्या विरोधात मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
सोमवारी कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मकरंदराजे निंबाळकर सोबत नव्हते. त्यामुळे ते आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काळात ठाकरे सेनेला घरातीलच हे आव्हान पेलण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.