

Shivsena News : महाराष्ट्राच्या राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मोठ्या राजकीय घडामोडी येणाऱ्या काळात घडणार आहेत. प्रत्येक मराठी माणसाची अनेक वर्षांपासूनची इच्छा आता पूर्ण झाली आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. ज्या एकनाथ शिंदे यांना दूर लोटण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला, त्यांच्या पक्षातले लोक फोडले गेले आता त्याच शिवसेनेला गोंजारण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ठाकरेंच्या सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिंदेंना खड्यासारखं बाजूला काढल्यानंतर आता मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांसाठी त्यांना सोबत घेण्याची भाषा भाजपने सुरू केल्याचा दावाही खैरे यांनी केला. 'सकाळ'शी संवाद साधतांना खैरे यांनी येणाऱ्या 2029च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसेल, अशी भविष्यावाणीही खैरे यांनी केली.
मतचोरी आणि पैशाच्या जोरावर राज्यात आणि देशात भाजपचे राजकारण सुरू आहे. नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून पैशाचा महापूर आणला गेला. महाविकास आघाडी आणि आमच्याकडे तर पैसा नव्हता, आम्ही लोकांना हात जोडून मतं मागितली. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात सर्वसामान्य जनता भाजपच्या फोडाफोडी आणि पैशाचा राजकारणाला कंटाळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रतिसाद वाढू लागला आहे. निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा दावाही खैरे यांनी केला.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. माझे भाग्य आहे की मला ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करायला मिळते आहे. बाळासाहेबांचा सहवास मला लाभला, उद्धव ठाकरे हे त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. जे प्रेम बाळासाहेबांनी दिलं तेच उद्धव ठाकरे देत आहेत. ते प्रामाणिक नेते आहेत, कधी खोटं बोलणार नाहीत, असे सांगतानाच 2019 मध्ये भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असेही खैरे म्हणाले. भाजपने शब्द फिरवल्यामुळेच ठाकरे यांनी आपला बाणा दाखवला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी चांगलं वातावरण आहे. शिवसेना फुटली असं जरी विरोधकांना वाटत असलं तरी सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळंच आता संधी मिळणार नाही. आमच्याकडे पैसा नसला तरी पक्ष निष्ठा आणि आतापर्यंत केलेली विकासकामे या जोरावर आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.